घरताज्या घडामोडीमहागाई, इंधनदरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार, हँगिंग गार्डनपासून सायकल रॅली

महागाई, इंधनदरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार, हँगिंग गार्डनपासून सायकल रॅली

Subscribe

हँगिंग गार्डनपासून राजभवन पर्यंत सायकल रॅली काढून राज्यपालांना निवेदन देणार

मोदी सरकारच्या जुलमी व अन्यायी कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईतून जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार इंधनाचे दर दररोज वाढवत आहे. आजही सीएनजी व पाईप गॅसचे दर वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेस पक्ष या महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करत असून उद्या गुरुवार १५ जुलै रोजी राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. इंधन, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. जगणे मुश्कील केलेल्या या सरकारविरोधात काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. ७ जुलैपासून राज्यात विविध आंदोलने करून मोदी सरकारच्या या अन्यायी महागाईविरोधात आवाज उठवला आहे. उद्या हँगिंग गार्डनपासून राजभवन पर्यंत सायकल रॅली काढून राज्यपालांना निवेदन देणार आहे. जनतेचा आवाज केंद्र सरकारच्या कानावर पडेल आणि झोपी गेलेल्या मोदी सरकारने जागे होऊन जनतेला दिलासा द्यावा यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे, असे नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

ठाणे जिल्हा विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बदलापूरचे विठ्ठल किणीकर, सुरेश पाटील, मनिषा पोळ, समर्थ लाड, अविनाश पाटील, रोहितकुमार प्रजापती, अनिता प्रजापती, रुपेश अंबेरकर, रतन कांबळे, मनिषा कांबळे, साक्षी दिवेकर, मिरजा आंबेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी टिळक भवन, दादर येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रा. प्रकाश सोनावणे, रामकिशन ओझा, प्रमोद मोरे, मा. आ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -