मुंबई – बीडमधून रोज एक नवीन व्हिडिओ समोर येत आहे आणि बीडमधील गुन्हेगारांसोबत तिथल्या राजकीय नेत्यांचे कसे लागेबांध आहेत हे समोर येत आहे. बीडमधील प्रत्येक गुन्हेगारी कृत्यामागे तिथल्या स्थानिक आमदारांचा संबंध जोडला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी एकमेकांविरोधात जाहीर टीका सुरु केली आहे. यावरुन काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बीडमध्ये उद्या फ्री स्टाईल होईल, परवा तलवारी निघतील, नंतर बंदूका निघतील आणि एकमेकांचे खून करण्यापर्यंत हे राजकीय नेते जातील, असे भयंकर भाकित वर्तवले आहे. मंत्री नितेश राणे हे भाजपचे भाट आहेत. भाजपला अडचणीत आणण्याचे काम विरोधकांनी त्यांच्यावर सोपवले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी विधिमंडळ परिसरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी बीडमधील बिघडलेली सामाजिक, राजकीय परिस्थिती आणि वाढत्या गु्न्हेगारीवरुन सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. ते म्हणाले की, ‘बीडमध्ये आता कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. बीडचं राजकारण नासलेलंच आहे. बीडची एकूण राजकीय परिस्थिती बघता आता कुरघोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु झालं आहे. उद्या फ्री स्टाईल होईल, परवा तलवारी निघतील, नंतर बंदूका निघतील आणि एकमेकांचे खून करण्यापर्यंत हे राजकीय नेते जातील. यांचाही बळी जाईल आणि निष्पाप लोकांचाही बळी जाईल,’ अशी भीती माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
बिहारला मागे टाकणारा बीड जिल्हा झाला आहे. बीडच्या बिळात अनेक गुन्हेगार लपलेले आहेत. त्यांना जोपर्यंत बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत तिथे खून, खंडणी, मारहाण अशा घटना घडत राहतील, असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला.
भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि भाजपचा पदाधिकारी खोक्या उर्फ सतीश भोसले याला आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक झाली आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, खोक्याला अटक झाली ही आनंदाची बाब आहे. खोके भेटले आता त्याचे बोके कोण आहे तेही शोधावे. जसा आका कोण आहे ते शोधलं तसं खोक्याचा बोक्या कोण आहे, तेही शोधावे, असं म्हणत वडेट्टीवारांनी अप्रत्यक्षपणे सुरेश धसांना टोला लगावला.
हेही वाचा : Suresh Dhas : कट्टर कार्यकर्ता खोक्याच्या अटकेची बातमी ऐकताच धस अण्णा म्हणाले…