Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सेलिब्रिटी ट्विट प्रकरणात भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखाचा हात

सेलिब्रिटी ट्विट प्रकरणात भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखाचा हात

Related Story

- Advertisement -

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटसंदर्भात चौकशीचे आदेश राज्याच्या गृहमंत्रालयाने दिल्यावर या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. ज्यांच्या नावाने हे ट्विट करण्यात आले त्या सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांना या ट्विटसंबंधी काहीच माहिती नसल्याची बाब पुढे येऊ लागली आहे. याच संशयापोटी ट्विटची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र भाजपने काहूर माजवला आणि भारतरत्नांची चौकशी करण्याची हाकाटी पिटली. आता या ट्विटमागे कोण आहे, याची खातरजमा केली जात असून यात भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखाचा हात असल्याची बाब पुढे आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ही शक्यता याआधीच व्यक्त केली होती. या संशयामुळेच चौकशी करण्यास सांगण्यात आले होते असे देशमुख यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

देशमुख म्हणाले की, लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर आमची श्रध्दा आहे. पण शेतकर्‍यांच्या आंदोलनावर ते असे ट्विट करतील, असे कोणालाच वाटत नव्हते. अशा परिस्थितीत हे ट्विट करणारी व्यक्ती कोण याचा शोध घेणे म्हणजे या दोन्ही मान्यवरांच्या विषयी जाणीवपूर्वक केलेली मानहानी दूर करणे होय, असे देशमुख म्हणाले. भाजपचे नेते मात्र या मान्यवरांची चौकशी सरकार करत असल्याची हाकाटी देत होते. या ट्विट प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख आणि इतर 12 जणांचा समावेश असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस या सर्वांना हुडकून काढतील आणि त्यांच्या विरोधात कडक कारवाई करतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

ज्या सेलिब्रिटींच्या नावाने हे ट्विट करण्यात आले त्यापैकी कोणीही ट्विट केल्याचे अमान्य केले. असे आपले मत होते, असेही त्यांनी म्हटलेले नाही. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चौकशीची मागणी केल्यानंतर ट्विटच्या समर्थनार्थ एकही सेलिब्रिटी व्यक्ती पुढे आला नाही. त्यावरून आमचा संशय अधिक गडद झाल्याचे सावंत म्हणाले. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी भाजपचा आयटी सेल देशभर कामाला लागला होता. मुंबईत त्याचा सुगावा लागला आणि पोलिसांनी वर्मावर बोट ठेवल्याचे सावंत म्हणाले.

पॉप गायिका रिहानासह इतरांना उत्तर देताना अनेक सेलिब्रिटी विरुद्ध ट्विट केले होते. यामध्ये सुनील शेट्टीने मुंबई भाजप नेते हितेश जैन यांना टॅग केले होते. तर अक्षय कुमार आणि सायना नेहवाल ह्यांच्या ट्विटमधील शब्द आणि शब्द समान होता. यावरून हे सेलिब्रिटी भाजप सरकारच्या दबावात येऊन ट्विट करत आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता.

- Advertisement -