भाजपच्या देशभरात सुरू असलेल्या विजयी घोडदौडीला कर्नाटकात लगाम लागला. कर्नाटकात सलग दुसर्यांदा सत्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या प्रचार यंत्रणेने पूर्ण जोर लावूनही जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा कौल दिला आणि मागील 38 वर्षांची सत्तापालट करण्याची परंपरा कायम ठेवली. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. या निकालात मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांच्या पुढे झेप घेत काँग्रेसने 136 जागा जिंकल्या, तर भाजपला 65 जागांवर समाधान मानावे लागले.
2018 च्या निवडणुकीत जनता दल सेक्युलर(जेडीएस) किंगमेकर ठरले होते, परंतु मतदारांनी यंदा ती संधीच दिली नाही. जेडीएसला अवघ्या 19 जागा मिळाल्या. काँग्रेसने आज रविवारी बंगळुरूत आपल्या विजयी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरल्यानंतर काँग्रेसकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येईल, असे म्हटले जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत काँग्रेसने दिलेली 5 आश्वासने पूर्ण करण्याची ग्वाही मतदारांना दिली आहे.
मागील 2018च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या 56 जागा वाढल्या आहेत, तर भाजपला 39 आणि जेडीएसला 18 जागांचा फटका बसला आहे. काँग्रेसने डिसेंबर २०२२ मध्ये हिमाचल प्रदेशात भाजपची सत्ता उलथवून लावली होती. पाठोपाठ लोकसभा निवडणुकीआधी दक्षिणेतील महत्त्वाच्या राज्यात झालेला पराभव भाजपसाठी धक्का मानला जात आहे. भाजपने प्रचाराच्या रणधुमाळीत जय बजरंग बली, द केरला स्टोरी, मुस्लीम आरक्षण रद्द, हिजाब वाद आदी मुद्दे उकरून काढले, परंतु या मुद्यांमध्ये न भरकटता काँग्रेसने प्रचारात पूर्णतः राज्यातील विषयांवरच भर दिला होता.
भारत जोडो यात्रा काढून राहुल गांधी यांनी स्थानिक नेत्यांना चांगलेच बळ दिले होते. पाठोपाठ सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही प्रचारात जोर लावला. त्याची परिणती मतांमध्ये झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपला गड राखला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी भाजप नेते आणि मंत्री आर. अशोक यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला, तर मावळत्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकारमधील अनेक मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामध्ये बी. श्रीरामुलू, के. सुधाकर, जेसी मधुस्वामी, गोविंद करजोल, एमटीबी नागराज जेसी, नारायण गौडा आणि विधानसभा अध्यक्ष व्ही. हेगडे यांचा समावेश आहे. बसवराज बोम्मई शिग्गाव आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र हे शिकारीपुरा मतदारसंघातून विजयी झाले.
घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेस सावध
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’द्वारे होणार्या फोडाफोडीचा काँग्रेसला दांडगा अनुभव आहे. त्यामुळे घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने सर्व विजयी आमदारांना बंगळुरूला बोलावले आहे. बंगळुरूतील एका आलिशान हॉटेलमध्ये या सर्व आमदारांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. या सर्वांवर पक्षातील पदाधिकार्यांची नजर असणार आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी डी. के. शिवकुमार आणि सिद्धरमय्या यांची नावे चर्चेत
काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणार्या माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना दिल्लीत बोलावले आहे. हे दोन्ही नेते रविवारी दिल्लीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करतील. त्यानंतरच कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल हे स्पष्ट होईल. मुख्यमंत्रीपद काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या हाती सोपवावे, अशी गुगली शिवकुमार यांनी टाकली आहे.
बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव
बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील सर्व उमेदवारांचा पराभव झाला. येथे काँग्रेसचे ११, तर भाजपचे ७ उमेदवार विजयी झाले आहेत.
कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो. आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करू.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
द्वेषाचा बाजार बंद झाला असून प्रेमाचे दुकान उघडले आहे. मी कर्नाटकची जनता, काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. कर्नाटकात गरिबांच्या शक्तीने भांडवलदारांच्या ताकदीला हरवले. हेच आता प्रत्येक राज्यात होईल. आम्ही ही लढाई द्वेष, चुकीच्या शब्दांनी नाही, तर प्रेमाने लढलो. या निवडणुकीत आम्ही कर्नाटकच्या जनतेला 5 आश्वासने दिली होती. ही आश्वासने आम्ही पहिल्याच दिवशी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण करणार आहोत.
-राहुल गांधी, काँग्रेस नेते
हा खर्या अर्थाने कर्नाटकच्या जनतेचा आणि काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे. त्यांनी प्रगतीशील भविष्यासाठी, कल्याणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी मतदान केले आहे. त्यांनी काँग्रेसवर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही हात जोडून त्यांचे आभार मानतो. काँग्रेस कर्नाटकच्या जनतेला दिलेल्या 5 आश्वासनांची पूर्तता करेल.
-मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय अध्यक्ष, काँग्रेस
कर्नाटकात कोणतेच सरकार परत येत नाही. २०१८ साली भाजपच्या १०६ जागा आणि ३६ टक्के मते मिळाली होती. आता भाजपला ३५.६ टक्के मते मिळाली. म्हणजे ०.४ टक्के मते आणि ४० जागाही कमी झाल्यात. २०१८ साली काँग्रेसला ३८ टक्के, तर जेडीएसला १८ टक्के मते मिळाली होती. जेडीएसची ५ टक्के मते कमी होऊन ती काँग्रेसला मिळाली. त्यामुळे काँग्रेसचा विजय झाला. या निवडणुकीचा देशात आणि महाराष्ट्रात परिणाम होणार नाही. देशात मोदींचे आणि महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार येणार आहे.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
कर्नाटकमध्ये भाजपने फोडाफोडी करून काँग्रेसकडून सत्ता बळकावली होती. लोकांना फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण आवडत नाही तसेच राजकारणासाठी धर्म, जात यांचा वापरही लोकांना आवडत नाही हे कर्नाटक विधानसभा निकालातून स्पष्ट झाले. कर्नाटकच्या जनतेने फोडाफोडीला संधी मिळणार नाही याची खबरदारी घेतली आहे. हळूहळू एका व्यक्तीच्या हातात सगळी सूत्रे या गोष्टीला लोकांचा पाठिंबा नसल्याचे दिसू लागले आहे.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले. हिंदू, मुसलमान, बजरंग बली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नावर निवडणूक लढवली व जिंकली. 2024 च्या विजयाची ही नांदी आहे. प्रियांका आणि राहुल गांधी यांचे खास अभिनंदन.
-उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उबाठा)