सरकारमध्ये संधी मिळत नसल्याने काँग्रेसचे मंत्री नाराज; सुनील केदार यांच्या घरी बैठक

आज काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या घरी बैठक बोलावली असून, सरकारमध्ये नेमकी कॉंग्रेसची भूमिका काय यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Congress ministers are not happy with govt Decision making process as they are not giving chances to congress
सरकारमध्ये संधी मिळत नसल्याने काँग्रेसचे मंत्री नाराज

‘हे सरकार शिवसेनेचे सरकार’, असल्याची भावना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा होती. मात्र, आता तर काँग्रेसचे मंत्रीच नाराज असल्याचे समजते. याचसाठी आज काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या घरी बैठक बोलावली असून, सरकारमध्ये नेमकी कॉंग्रेसची भूमिका काय यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

निर्णय प्रक्रियेत संधी नसल्याने काँग्रेस नाराज

सध्या राज्यात कोरोनाचे संकट आहे. मात्र, या संकटाच्या काळात काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणत्याच निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याची खंत सध्या काँग्रेसच्या मंत्र्यांना आहे. एवढेच नाही तर जितके महत्व सध्या या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आहे तितके महत्व काँग्रेसच्या मंत्र्यांना मिळत नसल्याचे काहींनी खासगीत बोलताना सांगितले. त्यामुळेच काँग्रेसचे मंत्री आता आपली सरकारमध्ये नेमकी भूमीका काय आहे यावर बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

अधिकाऱ्यांमुळेही काँग्रेसचे मंत्री नाराज

सगळ्यात महत्वाचे म्हणजे काँग्रेसच्या मंत्र्यांची नाराजी ही अधिकारी वर्गामुळे देखील वाढली आहे. मुख्य सचिव तसेच त्या त्या विभागाचे प्रधान सचिव हे मंत्र्यांना न विचारताच निर्णय घेतात, असे देखील एका मंत्र्याने सांगितले. एवढेच नाही तर कोरोनाच्या काळात काही निर्णय परस्पर घेतले गेले याची साधी कल्पना देखील मंत्र्यांना मिळत नसल्याचे देखील या मंत्र्याने बोलून दाखवले.

कॅबिनेटमध्येही मंत्री आणि सचिवांमध्ये वाद

दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे निवृत्तीनंतर सलग ९ महिने राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम करत आहेत. मात्र, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना विश्वासात न घेताच प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे तीव्र पडसाद उमटले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, असे कोणतेच वाद झाले नसल्याचे सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.


हेही वाचा  – पवार जागेच आहेत! दुखणारे पोट शेकत बसा; सामनातून भाजपवर टीका