Homeमहाराष्ट्रनागपूरBeed Murder : नामदेव शास्त्री, जरांगे यांच्या भूमिकेवर वडेट्टीवारांचा सवाल; धनंजय मुंडेंचे...

Beed Murder : नामदेव शास्त्री, जरांगे यांच्या भूमिकेवर वडेट्टीवारांचा सवाल; धनंजय मुंडेंचे नाव न घेता लगावला टोला

Subscribe

नागपूर –  गुन्हेगाराला जात, धर्म काही नसतं, बीड प्रकरणाला जो जातीय रंग दिला जात आहे,  ते योग्य नाही. बीडमधील घटनेला मराठा विरुद्ध वंजारी किंवा ओबीसी  रंग दिला हे चुकीचं आहे. कोणत्याही साधू, संतांनी गुन्हेगाराला पाठीशी घालणं योग्य नाही. महंतांनी त्यांच्या मर्यादा पाळायला पाहिजे. उलट त्यांनी सरकारला निष्पक्ष चौकशी व्हावी, जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली पाहिजे. यातून संतांचं श्रेष्ठत्व दिसलं असतं, असा टोला काँग्रेस नेते, आमदार आणि माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भगवान गटाचे महंत नामदेव शास्त्री यांचे नाव न घेता लगावला. मंत्री धनंजय मुंडे यांनीही बीडमधील घटनेनंतर तिथे जाऊन चौकशीची मागणी केली पाहिजे होती. राज्यात कायद्याचे राज्य आहे, हे दाखवून दिले पाहिजे होते, असा टोला वडेट्टीवार यांनी मंत्री मुंडे यांना लगावला. ते माध्यमांसोबत बोलत होते.

अमूक आमच्या समाजाचा, तमूक त्यांच्या समाजाचा असं म्हणून गुन्हेगारांचं समर्थन करणे योग्य नाही. महाराष्ट्राला गुन्हेगारीचा अड्डा करायचा आहे का? महाराष्ट्राला बिहार करायचे का? असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, एकमेकांचे समाज गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागले तर उद्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था शिल्लकच राहणार नाही. सरकारने आपली जबाबदारी ओळखून काम करायला पाहिजे.

जरांगे पाटलांना प्रत्येक ठिकाणी बोलायची गरज नाही – वडेट्टीवार

मनोज जरांगे यांना प्रत्येक ठिकाणी बोलायची खरंतर गरज नाही, मात्र प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटील येतात. बीडचा विषय वेगळा होता, त्यांनी त्याला तसे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरही केला.

आता भावनिक कशाला होता, मंत्री मुंडेंना टोला

आमदार सुरेश धस हे या प्रकरणात थेट बोलत आहेत. त्यांची भूमिका बॅलन्स होती, एखाद्या घटनेला समाजावर नेणं चूक आहे, असे सांगत विजय वडेट्टीवार म्हणाले, देशमुख असतील किंवा वाल्मीक कराडच्या पाठीराख्यांनी जातीवर आणि समाजावर जाणे योग्य नाही. संतोष देशमुखांच्या संदर्भातील घटनेचे समर्थन करणारा माणूस हा नालायक असतो, तो जगण्याच्या लायक नाही. मात्र आता काही लोक भावनिक होत आहेत, कशाला भावनिक होता, असा टोला वडेट्टीवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला.

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, मंत्र्यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन पीडित कुटुंबांची भेट घेतली पाहिजे होती. तुमच्या जिल्ह्यातील घटना आहे. कुटुंब आणि प्रशासनाला भेटून झाल्यावर मंत्र्यांनी कारवाईची मागणी करायला पाहिजे होती. त्यांनी सांगितलं पाहिजे होतं, मी पाठीमागे आहे निःपक्ष चौकशी करा. त्यावेळी यांची तोंडं बंद होती, असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी मंत्री मुंडेंवर केला.

जिल्ह्याला बीड करायचे का, असे उदाहरण दिले जाते…

विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज सगळ्या ठिकाणी बीडचं उदाहरण दिलं जातं. पूर्वी बिहार म्हणायचे, आता बीड म्हणतात. चंद्रपूर जिल्हा डीपीसीच्या बैठकीत सुधीर मनगंटीवार म्हणाले, आपल्या जिल्ह्याला बीड करायचा नाही. भाजप नेत्यांच्या वक्तव्यातहूनही बीड किती भयावह आहे, हे दिसत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची ओळख पुसली जायला नको, गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला कायद्याने ठेचून काढायला हवे. तो कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही समाजाचा असला तरी, हिच भूमिका सर्व संत, महंतांनी आणि सर्व समाजाच्या नेत्यांनीही घ्यावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा : Sanjay Raut : फडणवीसांचे कुटुंब वर्षा बंगल्यात जायला घाबरते का? राऊतांनी का केला असा सवाल