घरमहाराष्ट्रविखेंसह काँग्रेसचे ४ आमदार भाजपात

विखेंसह काँग्रेसचे ४ आमदार भाजपात

Subscribe

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा मोठा धक्का बसलेल्या काँग्रेसला लवकरच राज्यात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसचे चार आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे आणि अब्दुल सत्तार हे तिघेही विखे पाटील यांच्यासोबत भाजपात जाण्याची चिन्हे आहेत. याशिवाय आणखी दोन आमदारही भाजपात जाणार असे बोलले जाते आहे. मात्र त्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था दारूण झाली आहे. अवघी एक जागा काँग्रेसला जिंकता आली आहे. सुजय विखे पाटील हे भाजपात गेल्याने राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपात जातील अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. आता सुजय विखे पाटील भाजपाच्या तिकिटावर निवडूनही आल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसचे महत्व उरलेले नाही.

- Advertisement -

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी कमजोर करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फोडण्याची भाजपाची योजना आहे.

या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी उघडपणे काँग्रेस आघाडीविरोधात काम केले आहे. अशा नाराज आमदारांना आणि नेत्यांना गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आघाडीच्या उमेदवाराविरोधात काम केले होते, त्यांनाही आपल्या गळाला लावण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला असल्याचे समजते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी भाजप कमजोर आहे आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे, अशा आमदारांनाही गळाला लावण्याची योजना भाजपाने आखली असल्याचे समजते.

- Advertisement -

मुंबईतील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हेही लवकरच भाजपात प्रवेश करतील, त्यांनी यापूर्वीच भाजपाचे उघडपणे कामही सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. काँग्रेसला पुढे भवितव्य नाही असा विचार करत काँग्रेसचे नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते. काँग्रेसमध्ये राहिलो तर आपण निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी असे आमदार भाजपाशी जवळीक साधण्याची शक्यता आहे.

विखेंचा निर्णय आम्हाला मान्य- सत्तार
राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. त्यांच्याकडे सर्वाधिकार आहेत, असे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. विखे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असेही सत्तार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -