Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रPraniti Shinde : देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम, कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

Praniti Shinde : देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम, कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

Subscribe

सोलापूर : महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली. त्यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रातही पुन्हा एकदा विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. नुकतेच कॉंग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम आहेत, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे. (Congress MP Praniti Shinde on CM Devendra Fadnavis on evm issue)

हेही वाचा : Beed Crime : सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनावरच संशय, अंजली दमानियांनी केले आरोप 

“लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या पायाखाली जमीन सरकली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी कटकारस्थान केले, हे आम्ही आकडेवारीसह तुमच्यासमोर मांडत आहोत. चार महिन्यांमधेय इतके मतदार कसे वाढले? निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत,” अशा शब्दात कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी हल्लाबोल केला. “देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा समाजाच्या तीव्र भावना होत्या. आता देवेंद्र फडणवीसच त्यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून थोपवले गेले आहेत. ईव्हीएम सीएम असेच देवेंद्र फडणवीस यांना म्हणता येईल,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात मतदान वाढले असल्याची तक्रार आम्ही केली होती. पण अद्यापही आम्हाला त्यासंदर्भात यादी मिळालेली नाही. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असूनही निवडणूक आयुक्त हे भाजप कार्यकर्ते असल्यासारखे काम करत आहेत. तसेच, 2019 ते 2024 दरम्यान मिळालेल्या आकडेवारीनुसार जवळपास 5 लाख मतदार संख्या वाढली होती. लोकसभा निवडणूक 2024 ते विधानसभा निवडणूक 2024 दरम्यान 75 लाख मतदार संख्या कशी काय वाढली?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. जोपर्यंत मतपत्रिकांवर मतदान होत नाही, तोपर्यंत आमचा विश्वास बसणार नाही, असेही त्यांनी पुढे नमूद केले.