मुंबई : “मतदान दिनीचा फार्म 17 सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता (परिशिष्ट-57) व अंतिम निकाल (फार्म-20) पडताळणीसाठी याची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्याव्यात,” अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविले आहे. (Congress Nana Patole wrote letter to chief electoral officer before election)
हेही वाचा : Congress : मी सत्तेतला आमदार असणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा; आघाडीचा आकडाही सांगितला
मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, “निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदी अन्वये मतमोजणी टेबलवर फेरीनिहाय मतमोजणी झाल्यावर फार्म 17 सी मोजणी प्रतिनिधीची सही घेऊन मोजणी पर्यवेक्षक निवडणूक निर्णय अधिकारी यांना देतो. त्या अगोदर त्याची दुय्यम प्रत मोजणी प्रतिनिधी यास किंवा उमेदवार प्रतिनिधी यास त्वरित देण्यात यावी. तसेच फेरीनिहाय तक्ता हा फार्म 17 सी भाग 2 वरून सहायक निवडणूक अधिकारी तयार करतो तो परिशिष्ट 57 च्या तक्त्याची दुय्यम प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी. ही कायदेशीर तरतूद असून याद्वारे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक आहे हे समजून येईल.”
“मताचे संकलन फॉर्म 20 मध्ये काटेकोरपणे झाले आहे की, नाही हे उमेदवार प्रतिनिधीला प्राप्त फार्म 17 सी भाग 2 तसेच फेरीनिहाय तक्त्यावरून होवू शकते. या कायदेसंमत बाबी ध्यानात घेवून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना आपल्या स्तरावर या प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना द्याव्यात,” असे या पत्रात म्हटलेले आहे. दरम्यान, निकालाआधी महाविकास आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही देखील मुंबईला जाणार आहात का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारले. यावर ते म्हणाले की, “मी आणि देवेंद्र फडणवीस नागपूरवरून मुंबईला बरोबरच जाणार आहोत,” असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा झाली.