घरमहाराष्ट्रपुण्यात आघाडीचं ठरलं!

पुण्यात आघाडीचं ठरलं!

Subscribe

काँग्रेस-३, राष्ट्रवादी -४,एक जागा मनसेला?

काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात पुणे शहरातील आठ विधान सभा मतदार संघांपैकी हडपसर, खडकवासला, पर्वती, वडगावशेरी हे चार मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर, शिवाजी नगर, कॅन्टोन्मेंट आणि कसबा हे तीन मतदार संघ काँग्रेसला देण्यात आले आहेत. तसेच कोथरूड विधान सभा मित्र पक्षाला दिला जाईल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे जाहीर केले. मात्र कोथरूड विधान सभेची जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिली जाईल, अशी चर्चा आहे.

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी जागा वाटपाचा तपशील जाहीर करतानाच एका जागेविषयीची संभ्रम कायम ठेवला आहे. अजित पवार यांनी चार मतदार संघांची नावे जाहीर करताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या चार विधान सभा मतदारसंघापैकी खडकवासला मतदार संघ हा बारामती लोकसभा मतदार संघात आणि हडपसर विधान सभा मतदारसंघ हा शिरुर लोकसभा मतदार संघात आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील पर्वती आणि वडगांव शेरी हे दोन विधान सभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहेत. या चारपैकी वडगांवशेरी ही जागा २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती. उर्वरीत तीनही विधान सभा मतदारसंघात राष्ट्रवादीला विजय मिळविता आलेला नाही. हडपसर विधान सभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असली तरी अंतर्गत गटबाजीमुळे येथे विजय मिळाला नाही.

- Advertisement -

काँग्रेसला शिवाजी नगर, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट हे विधान सभा मतदार संघ मिळाले असून, यामध्ये शिवाजी नगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट हे मतदार संघ २००९ साली काँग्रेसने जिंकले होते. तर कसबा विधानसभा मतदारसंघांत त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. कोथरुड विधान सभा मतदार संघ हा काँग्रेस आघाडीकडून मित्र पक्षांकरीता सोडला जाणार आहे. या जागेवर काँग्रेस आघाडीकडून मनसेला मदत केली जाऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ले असणार्‍या मतदार संघातील उमेदवारांची यादी पक्षाकडून लवकरच जाहीर केली जाईल. परंतु काही मतदार संघातील उमेदवारांची घोषणा ही भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच केली जाणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -