राज्यातील आगामी मनपा निवडणुकीत एक परिवार, एक तिकीट; नाना पटोलेंची घोषणा

“प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून 60 टक्के तरुणांना निवडणुकीसाठी संधी देण्याची घोषणा केली. यात काँग्रेस कमिटीने 50 टक्के जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एक कुटुंब एक तिकीट हा निर्णय स्वागतार्ह आहे. ही संकल्पाना आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये लागू करणार आहोत.” अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नागपूर विमानतळावर आज ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “एकीकडे महागाई, बेरोजगारी, मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न आहेत. देशाच्या सीमाही सुरक्षित नाहीत आणि आता देशाच्या संविधानिक सीमा सुरक्षित राहिलेल्या नाहीत, संविधान सुरक्षित राहिले नाही ही चिंता काँग्रेसने गेल्या तीन दिवसांच्या शिबिरात व्यक्त केली. सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वात 2 ऑक्टोबरपासून देशात एक जन जागरण मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून देशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देण्याचा काँग्रेसच्या वतीने केला जाईल.”

“काँग्रेस एक विचार आहे, कोणासारखं सत्तेसाठी काहीपण करायचं अशी भूमिका काँग्रेसची राहिली नाही. काँग्रेसने या देशाला मोठं केल. लोकांना हे कळायला लागलं आहे की, काँग्रेसशिवाय या देशाला कुठलाही पर्याय नाही. यामुळे निवडणुक जिंकण्यासाठी गैरवापर भाजप करतेय, तसा गैरवापर काँग्रेस करणार नाही. विचारांनी या लढाया जिंकू अशी भूमिका आम्ही वेळेप्रमाणे स्पष्ट करणार” असल्याची नाना पटोलेंनी सांगितले आहे.

“लोकशाहीचा अर्थ कोणाला कळला नाही, कळला, मला माहित नाही. मात्र लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. त्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. त्याला अन्न, वस्त्र निवारा, रोजगार यासर्वांची गरज आहे. मात्र केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर देशातील तरुणांचा रोजगार काढण्यात आला. जवळपास 45 कोटी युवकांना नोकऱ्यांपासून दूर ठेवण्यात आले. अडीच कोटी नोकऱ्या रद्द करण्यात आल्या. मोठ्याप्रमाणात महागाई वाढली. देशाचा अन्नदाता शेतकऱ्यांशी बोलण्यास तयार नाही अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण केली. रुपयाची किंमत रोज पडू लागली यामुळे देशात महागाई वाढली, देश मागे गेला.” असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.