Gupkar Alliance: चीनकडून ३७० कलम लागू करण्याची भाषा बोलणाऱ्यांसोबत काँग्रेसची आघाडी का?

bjp leader devendra fadanvis

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी जाहीर वक्तव्य केले आहे की, चीनच्या मदतीने ३७० कलम पुन्हा लागू करु. याच फारूक अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये गुपकार आघाडी स्थापन झाली आहे. या आघाडीने काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ अ पुन्हा लागू करावा आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल व्हावा, यासाठी आंदोलनाची भाषा वापरली आहे. या आघाडीत काँग्रेस पक्ष देखील सामील झाला आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर टीका केली आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर मधील ३७० कलम रद्द करुन मागच्या ७० वर्षांची संपुर्ण देशाची मागणी पुर्ण केली. जम्मू, काश्मीर आणि लडाख हा भारताचा भूभाग आहे. त्यावर पाकिस्तानमधील विघटनशक्ती स्वतःचा हक्क सांगत होत्या. ३७० रद्द केल्यामुळे त्यांना चांगलीच चपराक मिळाली. मात्र आता गुपकार आघाडी स्थापन करुन पुन्हा ३७० कलम लागू करण्याची राष्ट्रविरोधी मागणी काही पक्ष करु लागले आहेत. गुपकार आघाडीत असलेल्या पीडीपी पक्षाच्या मेहबुबा मुफ्ती यांनी ‘काश्मीरचा झेंडा बहाल झाला नाही, तर आम्ही राष्ट्रीय झेंडा तिथे लावू देणार नाही’, असे वक्तव्य केले आहे. अशा लोकांच्या आघाडीत काँग्रेस सामील झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसला उघडे पाडण्याचे काम आम्ही सर्व देशभक्त मिळून केल्याशिवाय राहणार नाही.”

काश्मीरमधील लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही पीडीपी सोबत गेलो

“आम्ही ज्यावेळी पीडीपीची आघाडी केली, तेव्हा काश्मीरमध्ये लोकशाही व्यवस्था बळकट करण्याची आवश्यकता होती. नाहीतर पाकिस्तानकडून धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही आघाडी केली. मात्र जेव्हा पाकिस्तानचा विषय संपुष्टात आला तेव्हा आम्ही सत्ता सोडली. पण जोपर्यंत आम्ही पीडीपीसोबत सत्तेत होतो, तेव्हा मेहबुबा मुफ्ती यांची भारतीय झेंड्याचा अपमान करण्याची हिंमत झाली नाही.”, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.