अमृता फडणवीस महाराष्ट्राच्या वहिनी आहेत, त्यांनीही कुंकू लावलं पाहिजे; भिडेंविरोधात पुण्यात आंदोलन

amruta fadnavis and sambhaji bhide

पुणे – आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलेन असं उद्धटपणे प्रश्न विचारणाऱ्या एका महिला पत्रकाराला उत्तर दिल्याने शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यावरून काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात माजी नगरसेविका संगीता तिवारी यांच्या नेतृत्त्वाखील आंदोलन करण्यात आलं.

“तुम्ही आधी घरातून सुरु करा, नंतर पत्रकारांना सांगा. तुमच्या सुनबाई अमृता फडणवीस तुमच्यासमोर तशाच येतात ना. त्या तर महाराष्ट्राच्या वहिनी आहेत, मग त्यांनीही कुंकू टिकली लावली पाहिजे. आधी घरातून सुरुवात करा,” अशी टीका संगीता तिवारी यांनी केली.

“आम्हाला शिकवणारे तुम्ही कोण? संविधानाने आम्हाला कसं राहायचं, काय घालायचं याचा हक्क दिला आहे. उद्या तुम्ही जीन्स, टी-शर्ट घालू नका, डोक्यावर पदर घ्या असं सांगाल. हा काय तालिबान आहे का? हा भारत देश असून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालतो. बायकांनी कुंकू लावायचं की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? तुम्ही भारतामाता धर्मांध केली आहे, आमची भारतमाता सर्वांना सामावून घेणार नाही. तुमच्यासारख्या माथेफिरु, धर्मवेड्यांनी भारतमातेचं नाव खराब केलं आहे. आम्ही मात्र ते होऊ देणार नाही. आम्ही तुम्हाला कोणत्या ब्रँडचं धोतर घालावं सांगितलेलं नाही,” अशी टीका त्यांनी केली.

अमरावतीतही आंदोलन

पुण्यापाठोपाठ अमरावतीमध्ये देखील संभाजी भिडेंविरोधात आंदोलन पुकारण्यात आले. अमरावतीमधील अंजनगाव येथे जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांचा पुतळा जाळून निषेध केला.