रिझर्व्ह बँकेने केंद्राला आरसा दाखवला, महागाईवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

मागील ८ वर्षांत देशाची अर्थव्यवस्था ढासळत आहे. रुपयाची घसरण होत आहे. जीडीपी घसरला, प्रत्येक क्षेत्राचा विकास मंदावला आणि महागाई मात्र प्रचंड वेगाने वाढत आहे. बेरोजगारी आणि महागाई वाढल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे, असेही पटोले म्हणाले.

congress party member welcoming nana patole with full of joy and cheers in nagpur

डोक्यावर स्वतःच्या हक्काचे छत असावे या भावनेतून सर्वसामान्य व्यक्ती घरासाठी कर्ज घेतो, परंतु मोदी सरकारच्या काळात जनतेसाठी पाण्यापेक्षा विष बरे अशी अवस्था झाली आहे. महागाई आणि ढासळत चाललेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ केल्याने सर्व प्रकारच्या कर्जांचे हप्ते वाढणार आहेत. रेपो रेट वाढवून रिझर्व्ह बँकेने केंद्राला आरसा दाखवला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केली.

विविधतेत एकता ही भारताची ओळख असून तीच ‘आयडिया ऑफ इंडिया’ आहे. काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करून देशाची अखंडता कायम ठेवली, मात्र केंद्रातील भाजपचे सरकार देशात धर्मांध लोकांचे प्रस्थ वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपचे हे कुटील कारस्थान काँग्रेस कदापि पूर्ण होऊ देणार नाही, असा इशाराही पटोले यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे.

देशात जोपर्यंत सामाजिक स्थैर्य निर्माण होत नाही तोपर्यंत देशाची आर्थिक प्रगती होणार नाही, असे राहुल गांधी सातत्याने सांगत आहेत, मात्र भाजप समाजात द्वेष पसरवून अस्थिरता निर्माण करीत आहे. धार्मिक मुद्द्यांना पुढे करून परिस्थिती बिघडवण्याचे काम होत असल्याने अर्थव्यवस्थेला ते मारक ठरत आहे. मागील ८ वर्षांत देशाची अर्थव्यवस्था ढासळत आहे. रुपयाची घसरण होत आहे. जीडीपी घसरला, प्रत्येक क्षेत्राचा विकास मंदावला आणि महागाई मात्र प्रचंड वेगाने वाढत आहे. बेरोजगारी आणि महागाई वाढल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे, असेही पटोले म्हणाले.

देशांतर्गत परिस्थिती बिकट झाली असताना जागतिक पातळीवरही आनंदी आनंदच दिसत आहे. भाजपच्या काही वाचाळ प्रवक्त्यांमुळे भारताची जगात प्रतिमा डागाळली आहे. २० देशांनी भाजप प्रवक्त्यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करीत भारताने माफी मागावी, असे म्हटले आहे, पण भाजपच्या चुकीसाठी देशाने माफी का मागावी, असा सवाल करीत पटोले यांनी भाजपने माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

काँग्रेसने कायम धर्मनिरपेक्षता जोपासली आणि आजही त्यावरच वाटचाल सुरू आहे. विविध धर्म, संस्कृती, रूढी, परंपरा असलेल्या भारत देशात केवळ काँग्रेसच अखंडता टिकवून ठेवू शकते. त्यामुळे काँग्रेस नेहमीच सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणारा पक्ष असून काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे, असेही पटोले म्हणाले.