आम्ही पाठीमागून वार करत नाही, नाना पटोले यांचा राष्ट्रवादीला टोला

लिखीत करार मोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर काय म्हणायचे? असा सवाल करत पटोले यांनी आघाडीत दगाफटका खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.

congress leader nana patole slams to bjp over sc reject obc reservation interim report

प्रामाणिकपणे मैत्री करणे आणि मैत्री निभावणे ही काँग्रेसची भूमिका आहे. आम्ही कायमच आघाडी धर्म पाळला आहे. आम्ही समोरून लढतो पाठीमागून वार करत नाही, असा जबरदस्त टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी राष्ट्रवादीला लागवला.

लिखीत करार मोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर काय म्हणायचे? असा सवाल करत पटोले यांनी आघाडीत दगाफटका खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. याशिवाय गेली अडीच वर्ष सत्तेत सोबत राहून राष्ट्रवादीने आम्हाला कशी वागणूक दिली या संदर्भात मी पक्षश्रेष्ठींना अवगत करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी तीव्र मतभेद झाले आहेत. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी कॉंग्रेस ही भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी बुधवारी केला होता. या आरोपाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खंडन केले होते. तर गुरूवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाना पटोले यांचे  विधान चुकीचे असल्याचे सांगत जबाबदार नेत्याने वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पटोले यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली. ते म्हणाले, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या अध्यक्ष, सभापतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? आम्ही जे काही करतो ते खुलेआम करतो. काँग्रेस पक्ष देशाच्या विकासाची आणि विचारांची लढाई लढत आहे, आम्ही परिणामाची चिंता करत नाही.

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरवले होते. ३० जानेवारी २०२२ रोजी या बाबतचे पत्र तिन्ही पक्षांनी काढले होते. त्यावर माझ्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई यांनी स्वाक्ष-या केल्या होत्या. महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मी सातत्याने संपर्क साधला आणि भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष, सभापती निवडणुकीत आघाडीबाबत चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवले आणि ऐनवेळी भाजपसोबत जाऊन पंचायत समित्यांमध्ये आणि गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली, असा आरोप पटोले यांनी लागवला.

जयंत पाटील यांनी मी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला होता हे मान्य केले आहे. त्यांना भाजपसोबत जायचे आहे हे त्यांनी अगोदरच सांगितले असते तर आम्हाला काही अडचण नव्हती. पण आम्हाला अंधारात ठेवून भाजपसोबत हात मिळवणी केली याचे दुःख आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आम्ही कधीही सत्तेसाठी लांगूनचालन केले नाही. परिणामांची चिंता करायला काँग्रेस सक्षम आहे, असेही पटोले म्हणाले.

आम्ही पाठीत खंजीर खूपसत नाही : अजित पवार

आम्ही पाठीत खंजीर खूपसत नाही किंवा तलवार खूपसत नाही आणि असे कधीही बोलत नाही, असे अजित पवार यांनी आज सांगितले. नाना पटोले कुठुन आले आहेत ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भाजपने बोलावे का पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेडलाईन बनण्यासाठी पटोले बोलले असावेत, असा टोलाही त्यांनी लागवला. आमचेही काही पदाधिकारी त्यांनी घेतले आहेत. १५ वर्षे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनी सरकार चालवले आहे. त्यावेळी कार्यकर्ते घेत होतो. इतर पक्षात जाऊन त्यांची ताकद वाढण्यापेक्षा एकमेकांच्या पक्षात राहतील हे पाहिले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.