मुंबई – ठाणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मागील दोन वर्षे मुख्यमंत्री ठाणेचे असल्यामुळे ठाण्याला मोठ्या प्रमाणात निधी वळता करण्यात आला. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात 700 कोटींची वाढ झाली आहे. मात्र गैरप्रकारही मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच महायुती सरकारला अडचणीत आणण्यासाठी आम्ही नितेश राणेंना ठेवले आहे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
नुकत्याच सादर झालेल्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाची सध्या चर्चा आहे. 2025-26 या अर्थिक वर्षासाठी आरंभिच्या शिल्लकेसह 5645 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. कोणतीही करवाढ नसणारा हा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 620 कोटींची वाढ करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना यावरुन विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात 700 कोटी रुपयांची वाढ दाखवण्यात आली असली तरी तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, गैरप्रकार झाला आहे. हॉस्पिटलच्या अनेक तक्रारी होत्या, खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्या आहेत, असा आरोप काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी केला.
ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना वेळ नाही आणि खाली चरायला मोकळे, अशी स्थिती गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये ठाण्याची होती. त्यामुळे या सर्व तक्रारींची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.
सरकारला अडचणीत आणण्याची जबाबदारी नितेश राणेंना..
मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. नुकतेच त्यांनी मल्हार सर्टिफिकेशन मटण खावे असा सल्ला हिंदूंना दिला आहे. त्यावरुन वडेट्टीवार म्हणाले की, ‘एक दिवस नितेश राणे सरकारला अडचणीत आणतील. आम्हाला सरकारला अडचणीत आणायची गरज नाही. सरकारला अडचणीत आणण्याची जबाबदारी आम्ही नितेश राणेंवर सोपवली आहे,’ असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
ते म्हणाले की, ‘कोणी कोणते मटण खावे, हे काय चाललं? समाजाच्या भावना, धार्मिक भावना, महापुरुषांचा अपमान हे भाजपचे काम आहे. आता नितेश राणेंनी मल्हार मटण आणले आहे. मल्हार मटण म्हणजे काय? मल्हारराव होळकर काय फक्त मटणच खात होते का? मल्हार हे नाव अनेकांनी ठेवले आहे ते त्यांचे शौर्य आणि कामगिरी पाहून ठेवले आहे. नितेश राणेंची काय ही बुद्धी आहे.’ भाजपने पक्षाचा भाट म्हणून नितेश राणेंना सोडले असावे, असा टोलाही त्यांनी लगावला.