(Congress Vs ECI) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याने ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केलेला आहेच, पण त्याचबरोबर काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबतही आक्षेप घेतला आहे. अगदी शेवटच्या तासात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या टक्केवारीचा पुरावा निवडणूक आयोगाने द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला न भूता न भविष्यती असा विजय मिळविला आहे. सलग तिसऱ्यांदा जागांची शंभरी पार करताना भाजपाने तब्बल 132 जागा जिंकल्या आहेत. त्यातच प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएममधील आकडेवारीत तफावत आढळल्याची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला 288पैकी 95 मतदारसंघ असे होते की, ज्यात मतदान आणि ईव्हीएमची आकडेवारी जुळत नव्हते. त्यातच आता निवडणूक आयोगाने रात्रभरात मतदानाची दोनदा दिलेली वेगवेगळी टक्केवारी हा कळीचा मुद्दा बनला आहे.
हेही वाचा – Raut Vs Shinde : बाळासाहेबांचे नाव घेऊ नका, मुख्यमंत्रिपदावरून संजय राऊतांचा शिंदेंना टोला
राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान झाले. त्यावेळी सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के, सकाळी 11 वाजपर्यंत 18.14 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 टक्के आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान नोंदवले गेले. पण नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने रात्री उशिरा 11.30 वाजताचे अपडेट्स म्हणून 65.02 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. तर, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी 66.05 टक्के मतदान झाल्याचे सांगितले.
आता शेवटच्या टप्प्यात जवळपास साडेसात टक्क्यांनी मतदान वाढले आहे, ते पाहता मतदानासाठी कमीत कमी दोन-तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या असतील. निवडणूक पारदर्शक करण्यासाठी आग्रही असणारा निवडणूक आयोगाने व्हिडीओ, फोटोग्राफीची व्यवस्था केली असेलच. कुठल्या कुठल्या मतदान केंद्रांवर हे मतदान झाले? त्याचा पुरावा निवडणूक आयोगाने द्यावा. यानिमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरेही निवडणूक आयोगाने द्यावीत, अशी मागणी नवनिर्वाचित आमदार नाना पटोले यांनी केली.
हा सर्व प्रकार गंभीर असून निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकशाहीमध्ये लोकांची मते चोरण्याचे काम निवडणूक आयोगाचे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. याबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहेत, असे सांगत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांचा व्हिडीओ दाखविला. त्यात प्रभाकर यांनीही या वाढीव टक्केवारीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता आमच्या नवनिर्वाचित आमदारांसह पराभूत उमेदवारांबरोबर बैठका सुरू आहेत. आम्ही यासंदर्भात न्यायालयात दाद मागू, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Munde Vs Bawankule : मंत्रिमंडळात नव्यांना संधी अन् प्रदेशाध्यक्षपद पंकजा मुंडेंकडे, भाजपाची नवी रणनीती?
Edited by Manoj S. Joshi