Homeमहाराष्ट्रCongress Vs Mahayuti : दिखावा हा महायुती सरकारच्या कार्यपद्धतीचा भाग, सचिन सावंत...

Congress Vs Mahayuti : दिखावा हा महायुती सरकारच्या कार्यपद्धतीचा भाग, सचिन सावंत यांची टीका

Subscribe

जनतेचे करोडो रुपये खर्च करून दावोसला गेले आणि भारतीय कंपन्यांशी गुंतवणूकीचे करार केले. आता या सर्व कंपन्यांचे मुख्यालय मुंबईतच आहेत. मंत्रालयात बसून हे करार झाले असते.

(Congress Vs Mahayuti) मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने दोन दिवसांत 15.70 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे एकूण 54 सामंजस्य करार केले आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल, असा दावा केला जात आहे. हा महाराष्ट्राच्या दृष्टीने विक्रम असल्याचे सांगण्यात येते. मात्र, यातील बहुतांश कंपन्या महाराष्ट्रातील असून त्याचे मुख्यालय मुंबईत आहेत. त्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी फडणवीस यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत हेसुद्धा दावोस दौऱ्यावर गेले आहेत.

स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने गुंतवणुकीचा विक्रम नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत 6 लाख 25 हजार 457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले. गडचिरोलीचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पहिला सामंजस्य करार हा गडचिरोलीसाठी केला. विशेष म्हणजे, पहिल्या दोन दिवसांत महाराष्ट्राशी संबंधित आजवरचे सर्वाधिक करार झाल्याने दावोसमध्ये इतिहास घडला आहे.

या परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी जेएसडब्ल्यूसमवेत तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा करार करण्यात आला. स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रांतील गुंतवणुकीसंदर्भात हा करार आहे. तर, सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करण्यात येणार आहे. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे.

हेही वाचा – Chitra Wagh Vs Aaditya Thackeray : अपात्र बहिणींची संख्या वाढणार? चित्रा वाघांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

मात्र, सामंजस्य करार करण्यात आलेल्या 54 कंपन्यांपैकी बहुतांश कंपन्या भारतीय आहेत. त्यावरूनच विरोधकांनी महायुती सरकारला लक्ष्य केले आहे. ‘दावोस’ला का जावोस? असे म्हणत काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून महायुती सरकीरची टर उडवली आहे.

जनतेचे करोडो रुपये खर्च करून दावोसला गेले आणि भारतीय कंपन्यांशी गुंतवणूकीचे करार केले. आता या सर्व कंपन्यांचे मुख्यालय मुंबईतच आहेत. मंत्रालयात बसून हे करार झाले असते. रिलायन्सच्या अनंत अंबानी यांना मंत्रालयातून धन्यवादही देता आले असते! पण दिखावा, खोटेपणा हा या महायुती सरकारच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. (Congress Vs Mahayuti: Sachin Sawant’s criticism about Davos)

हेही वाचा – Balasaheb’s birth anniversary : तत्वांचा मुद्दा मांडत अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा