Homeमहाराष्ट्रपाच राज्यांत काँग्रेसचीच सत्ता येणार, आदित्य ठाकरे यांचा दावा

पाच राज्यांत काँग्रेसचीच सत्ता येणार, आदित्य ठाकरे यांचा दावा

Subscribe

पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षच जिंकणार असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. तर यामुळे INDIA आघाडी देशात अव्वल असणार असा विश्वासही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

रायगड : देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या पाच राज्याच्या निवडणुकांचा निकाल हा 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. या निकालामुळे देशातील भाजप आणि काँग्रेसच्या एकंदरित परिस्थितीचा अंदाज येणार आहे. या पाचही राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपकडून आपणच विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, काँग्रेस आणि भाजपच्या मित्र पक्षांकडून सुद्धा या विजयाबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या निवडणुकीत काँग्रेसच विजयी होणार असल्याचा मोठा दावा केला होता. पंरतु, आता शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्याकडून सुद्धा याबाबतचा दावा करण्यात आलेला आहे.

हेही वाचा – “एकनाथ शिंदेंनी स्वत:ला हिंदुहृदयसम्राट…”; राजस्थानमधील ‘त्या’ बॅनरवरून शिंदे गटाचा खुलासा

आदित्य ठाकरे हे सध्या दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्यामध्ये कोकणात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत खळा बैठक घेत आहेत. या खळा बैछकीच्या माध्यमातून ते कोकणातील वाड्यांमधील नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज (ता. 24 नोव्हेंबर) आदित्य ठाकरे यांनी खेडमध्ये खळा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षच जिंकणार असल्याचा दावा केला आहे. तर यावेळी INDIA आघाडी देशात अव्वल असणार असा विश्वासही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. (Congress will come to power in five states, claims Aaditya Thackeray)

आज खेड येथून बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळीकडेच बदलाचे वारे वाहू लागले आहेत. कर्नाटकात जी निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी भाजपने सर्व प्रयत्न केले. पंरतु, त्या राज्यातील नागरिकांनी तिथले भ्रष्ट सरकार पाडले आणि नवीन काँग्रेसचे सरकार बसवले. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस जिंकणार आणि इंडिया आघाडी अग्रेसर राहणार. हे तुम्ही लिहून घ्या, असा दावा आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच, जर का महाराष्ट्राचा विचार केला तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचा विजय होणार असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पाच राज्यांमध्ये खरंच काँग्रेसची सत्ता येऊन देशाच्या राजकारणात बदलाचे वारे वाहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याआधी देखील शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाच राज्यांमध्ये काँग्रेस विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. याबाबत त्यांनी पोस्ट करत दिल्लीतील सट्टेबाजाने त्यांना याबाबतची माहिती दिल्याचे सांगितले. याबाबत दावा करत जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट करत लिहिले होते की, दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारात सहज काही लोकांशी बोलत होतो. महाराष्ट्राच्या बाबतीतले त्यांचे अंदाज ऐकून मला स्वत:लाच धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीला 31 ते 33 जागा मिळतील आणि महायुती (भाजपा, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट) यांना 15 ते 17 जागा मिळतील, असे या सट्टेबाजांचे म्हणणे असल्याचा दावा त्यांनी केला.