घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गातील चारही नगरपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार

सिंधुदुर्गातील चारही नगरपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार

Subscribe

राज्यात युती असली तरी प्रत्येक पक्षाला स्वत: चा पक्ष वाढविण्याचा हक्क. काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहीती.

काँग्रेस पक्षाचे चिन्ह घराघरात मनामनात पोहचवायचे आणि पक्ष अधिकाधिक वाढवायचा आहे त्यामुळे कोणतीही तडजोड न करता जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. प्रत्येक नगरपंचायतीच्या सतराच्या सतरा जागा काँग्रेस लढवणार आहे. तसेच यापुढे वैचारिक बैठक असलेलेच कार्यकर्त्यांची फळी उभी करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा सिंधुदुर्गचे प्रभारी विनायकराव देशमुख यांनी ओरोस येथे पत्रकार परिषदेत दिली.

ओरोस येथे जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये काँग्रेसची विस्तारित बैठक आज पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे जिल्हा प्रभारी देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत माहीती दिली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे, प्रदेश सदस्य साईनाथ चव्हाण ,माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, दादा परब, इरशाद शेख,अरविंद मोंडकर,राजू मसुरकर, विजय प्रभू, चंद्रशेखर जोशी, महेंद्र चव्हाण, बाळू अंधारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते

- Advertisement -

काँग्रेसचे जिल्हा प्रभारी देशमुख यावेळी बोलताना पुढे म्हणाले की आपण जिल्हा प्रभारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या अठरा दिवस झाले आहेत या १८ दिवसात तीन वेळा जिल्हा दौरा केला. हा जिल्हा आव्हानात्मक जिल्हा आहे. असे असले तरी या जिल्ह्यात काँग्रेसची विचारधारा असलेले लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्याची संधी आहे. त्यासाठी आपण सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसचे चिन्ह घराघरात पोचविण्यासाठी आणि पक्ष वाढविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, देवगड आणि वैभववाडी या चारही नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पक्ष वाढविण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या सुचना केलेल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी आहे व भाजपाला रोखण्यासाठी एकत्र यायचे असे वाटत असले तरी प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा हक्क आहे. त्याप्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी आपआपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष ही आपली ताकत वाढवण्यासाठी स्वबळावर निवडणुका लढणार असून कसलीही तडजोड केली जाणार नाही असे देशमुख यांनी स्पष्ट केले

जिल्हा बँकेच्या बाबाबतीत अंतिम निर्णय झालेला नाही जिल्हा बँक निवडणूक ही वेगळी सहकारातील निवडणूक आहे त्यामुळे याबाबत या क्षेत्रातील काँग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री सतेज पाटील निर्णय घेणार आहेत असेही स्पष्ट करण्यात आले

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक स्थित्यंतरे येऊन गेली. काही नेते काँग्रेसमध्ये आले निवडणुका लागल्या आणि त्यानंतर दुसऱ्या पक्षात निघून गेले त्यांच्यावर तांत्रिकदृष्ट्या काही कारवाई करता आली नसली तरी आगामी काळात काँग्रेस वाढविताना वैचारिक बैठक असलेले कार्यकर्ते उभे केले जाणार आहेत. त्यामुळे पक्षातून इकडेतिकडे जाण्याचा प्रश्न राहणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आपण महिन्यातून चार ते पाच वेळा जिल्हा दौरा करणार असून काँग्रेसचे मंत्री सुद्धा या जिल्ह्यात पक्षवाढीसाठी आणले जाणार आहेत. ते आणताना सुद्धा त्यांचा शासकीय दौरा न लावता फक्त पक्षासाठी दौरा आयोजित करून जिल्हा व तालुकावार मेळावे घेतले जाणार आहेत आणि भविष्यात काँग्रेस पक्ष अग्रस्थानी राहील असा आपला प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे जुनेजाणते कार्यकर्ते व पदाधिकारी आता सक्रिय झाले असून आगामी निवडणुकांमध्ये निश्चितपणे चमत्कार घडवणार असल्याचा विश्वास काँग्रेस जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख यांनी बोलताना व्यक्त केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -