सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक, उद्या मुंबई-नाशिकमध्ये आंदोलन

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मुंबईत तर विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात नाशिक येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत.

sonia gandhi

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सुरू असलेल्या चौकशीच्या विरोधात गुरुवारी, २१ जुलै रोजी प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मुंबईत तर विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात नाशिक येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत. (Congress will lead tomorrow protest against sonia gandhi’s ed inquiry)

हेही वाचा – फोन टॅपिंग प्रकरण: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना 9 दिवसांची ईडी कोठडी

लोकशाही मूल्ये आणि  संविधानाला धाब्यावर बसवून केंद्रातील मोदी सरकारचा हुकूमशाही कारभार सुरू असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी आणि त्यांचा छळ करण्यासाठी या यंत्रणांचा गैरवापर सर्रास केला जात आहे, असा आरोप पटोले यांनी यावेळी केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हा सुद्धा याच षडयंत्राचा भाग आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

हेही वाचा – भूषण गगराणी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे. केंद्रीय तपाय यंत्रणा या मोदी सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत. याच प्रकरणात याआधी राहुल गांधी यांचीही पाच दिवस दररोज १०-१० तास चौकशी करण्यात आली. आता सोनिया गांधी यांची चौकशी केली जात आहे. वास्तविक पाहता नॅशनल हेराल्ड प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबाला नाहक त्रास देणे तसेच त्यांचा छळ करण्याचा प्रकार आहे, असा आरोप करताना पटोले यांनी काँग्रेस पक्ष भाजप आणि  मोदी सरकारच्या या दडपशाहीला लोकशाही मार्गाने उत्तर देईल, असा इशारा दिला.