रामायण सर्किटचे कनेक्शन; किष्किंधाच्या समावेशासाठीच अंजनेरीची बदनामी?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती रामायण सर्किट उभ करण्याची घोषणा

अजिंक्य बोडके । नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली हिंदुत्ववादी प्रतिमा अधिक ठळक करण्याच्या हेतूनेे, मागील काही काळात देशभरातील हिंदू देवस्थानांना उजळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातून अशा धर्मस्थळांना भव्य स्वरुप देणे, सुशोभिकरण तसेच या तीर्थस्थळाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी देऊन विकासकामे केली जात आहेत. त्यातच उत्तर प्रदेशातील निवडणुकीत गृहमंत्री अमित शहा यांनी अयोध्येत श्रीरामाच्या भव्य मंदिरासोबतच देशात रामायण सर्किट निर्माण करण्याचा मानस बोलून दाखवला होता. रामायण सर्किट उभे राहणार असेल तर त्यात हनुमानाचे स्थान नक्कीच मोठे असेल. हनुमानाचे जन्मस्थळ विकसित होणार असेल तर त्याठिकाणी हजारो कोटींचा निधी येणारच. इतका मोठा निधी येणार असेल तेव्हा त्या धर्मस्थळावर आपले प्रभुत्व असावे असेही या वाद करणार्‍यांना वाटत नसेल हे कशावरून, असा प्रश्न आता स्वामी गोविंदानंद यांच्या भूमिकेवरुन पडतो.

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्र्िपुंवर मात करणार्‍यांना हिंदू धर्मात साधू-संत म्हटले जाते. परमात्म्यात राहून मोक्ष मिळवण्याचे अंतिम ध्येय साधूंचे असते. परंतु, असे कोणतेही लक्षण मंगळवारी झालेल्या शास्त्रार्थ सभेत दिसले नाही. हनुमान कुठे जन्मले याचा फैसला करण्यासाठी जमलेल्या धर्मसभेत हनुमानाचे धर्मस्थान कोणते याचे विचारमंथन कमी आणि आम्हीच कसे धर्माचे खरे रक्षणकर्ते, आम्हीच कसे धर्माचे खरे पंडित, आम्हीच कसे सर्वश्रेष्ठ हे दाखवण्याचाच अहंकारी प्रयत्न झाला. महत्वाचे म्हणजे हा वाद अचानक का ओढून काढण्यात आला, असाही प्रश्न निर्माण होतो. रामायण सर्किटमध्ये किष्किंधा या स्थळाचा समावेश करण्यासाठी तर गोविंदानंद हे अंजनेरी स्थळाचा पत्ता कट करत नसावे ना, असा प्रश्न समस्त साधू-महंतांसह जाणकारही आता उपस्थित करत आहेत. या शास्त्रार्थ सभेने नक्की साध्य काय केले, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

विविधतेने नटलेला, एकाच हिंदू धर्मातच अनेक प्रथा, परंपरा, आराधना, भावना, श्रद्धा असलेला असा भारत देश आहे. या देशात देवांच्या बाबतही अनेक आख्यायिकाही प्रचलित आहेत. एकाच प्रकारची आख्यायिका विविध ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात सांगितली जाते. तिच्यावर त्या-त्या ठिकाणी विश्वासह ठेवला जातो. जसे जोतिर्लिंग, चारधाम किंवा इतरही अनेक बाबतीत भक्तांच्या विविध धारणा आहेत. महाराष्ट्रातील परळी वैजनाथ हे जरी जोतिर्लिंग असले तरी बिहारमध्येही एक वैजनाथ नामक एक भगवान शंकराचे देवस्थान आहे. तेथील लोक त्या देवस्थानाला जोतिर्लिंग मानतात. त्याच पद्धतीने औंढा नागनाथ आणि गुजरातमधील नागनाथ याबाबतही आहे. अशाच पद्धतीने हनुमानाचाही जन्म कुठे झाला याबाबत एक दोन नव्हे तर देशभरात तब्बल ६ ठिकाणी आख्यायिका, धारणा आणि श्रद्धा आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धारणा असूनही त्या-त्या ठिकाणी भक्त श्रद्धेने पूजा, आराधना करतात. त्यात त्यांना जन्मस्थळ नक्की कोठे आहे असा प्रश्न कधी पडत नाही की त्यांच्या श्रद्धेला या प्रश्नामुळे तडा कधी जात नाही. त्यामुळे तथाकथित शास्त्रार्थ सभेत हनुमान जन्मस्थळावरुन वाद घालून नक्की काय साध्य होणार, हे उपस्थित साधू-महंतांनाही स्पष्ट करता आले नाही.

हिंदू धर्मात अनेक आखाड्यांची परंपरा आहे. त्या आखड्यांमध्येही आपापसांत मत-मतांतरे आहेत. यामुळे त्यांच्यातही अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. अगदी ही मतमतांतरे युद्धापर्यंतही गेली आहेत. त्याचे मोठे उदाहरण आपल्याच नाशिकमध्ये बघायला मिळते. नाशिकमध्ये भरणार्‍या कुंभमेळ्यात नागा साधू व काही इतर त्र्यंबकेश्वर तर काही साधू नाशिकमध्ये शाहीस्नान करतात. त्यामागे याच युद्धाची पार्श्वभूमी आहे. पण याच प्रसंगानंतर या सर्व आखाड्यांनी स्वतःच एक आचारसंहिता स्वतःला घालून घेतली. आपसांतील कोणतेही वाद असोत त्याची सामान्य जनमाणसांत वाच्यता न होता ते चर्चेतून सोडवले जावेत. अशी ती आचारसंहिता आहे. परंतु, जेव्हा गोविंददास यांना वाल्मिक रामायणाच्या त्या दोन ओळीमुळे असे वाटले की हनुमानाचा जन्म हा कर्नाटकातील किष्किंदा येथेच झाला तर त्याबाबत त्यांनी नाशिकमधील साधू महंतांशी तसेच, आद्य शंकरचार्यांंशी याबाबत चर्चा करणे अपेक्षित होते. त्यांच्यासोबत याबाबत वाद-विवाद करून पुरावे सिद्ध करायला सांगणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी असे काही न करता सरळ माध्यमांसमोर त्यांनी वाल्मिक रामायणाच्या आधारे इतर सर्व आख्यायिका, पुराण, यावर शंका उपस्थित केल्या.