Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शिवसेनेच्या 350 पदाधिकार्‍यांचे नाराजीनामास्त्र!

शिवसेनेच्या 350 पदाधिकार्‍यांचे नाराजीनामास्त्र!

दोन महानगरप्रमुख 36 नगरसेवकांचा समावेश

Related Story

- Advertisement -

विधानसभेची निवडणूक निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली असताना नाशिक पश्चिम या मतदारसंघात भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेच्या तब्बल ३५०पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे देऊन अपक्ष उमेदवार विलास शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यात दोन महानगर प्रमुखांसह 36 नगरसेवकांनी आपले राजीनामे थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठवल्यामुळे भाजपच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

भाजप-सेना युतीच्या फॉर्म्युल्यात बदल करून नाशिक पश्चिम हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी लावून धरली. मात्र, अखेरच्या क्षणी ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने निवडणुकीच्या तयारीत असलेल्या शिवसेनेच्या इच्छुकांचा हिरमोड झाला. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या ३ इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यात सुधाकर बडगुजर व मामा ठाकरे यांनी उमेदवारी मागे घेऊन विलास शिंदे यांना पाठिंबा देत उघडपणे त्यांचा प्रचार सुरू केला.

- Advertisement -

या सगळ्या घडामोडींमुळे शिवसेनेकडून युतीधर्माचे पालन केले जात नसल्याची तक्रार उमेदवार सीमा हिरे यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत व दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मात्र दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी ठोस कृती न करता वेळ मारून नेण्याचे धोरण अवलंबल्यामुळे आमदार हिरे यांचा भ्रमनिरास झाला. तर स्थानिक पातळीवर ठाणे पॅटर्नचा मार्ग अवलंबत शिवसेनेच्या ३५० पदाधिकार्‍यांसह सर्व ३६ नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा देत विलास शिंदे यांना निवडून आणण्याची घोषणा महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत केली.

या घटनेने नाशिक पश्चिमसह शहरातील सर्वच मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून शिवसेनेकडून भाजपवर कुरघोडी करण्यासाठी सरळसरळ दबावतंत्राचा अवलंब केला जात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यावेळी महानगर प्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, माजी सभागृह नेता सुधाकर बडगुजर, महिला आघाडी प्रमुख सत्यभामा गाडेकर, मामा ठाकरे, नगरसेवक विलास शिंदे, सुदाम डेमसे, भागवत आरोटे, संतोष गायकवाड, प्रशांत दिवे, डी.जी. सूर्यवंशी, श्याम साबळे, दिपक दातीर, प्रविण तिदमे, चंद्रकांत खाडे, रमेश धोंगडे, संतोष साळवे, सुनील गोडसे, रविकांत लवटे, केशव पोरजे, नगरसेविका रत्नमाला राणे, हर्षा बडगुजर, सुवर्णा मटाले, हर्षदा गायकर, किरण दराडे, संगीता जाधव, कल्पना पांडे, नयन गांगुर्डे, राधाताई बेंडकुळे, जयश्री खर्जुल, सुनीता कोठूळे, मंगला आढाव, पुनम मोगरे आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, पक्षप्रमुखांकडे राजीनामा देऊन दबावतंत्र वापरण्याचा हा प्रयत्न चालवला आहे. याविषयी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली असून ते योग्य कारवाई करतील.
-सीमा हिरे, भाजप, उमेदवार.

या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असताना भाजपने ही जागा न सोडल्यामुळे नगरसेवकांच्या भावना तीव्र आहेत. युतीमध्ये जागावाटपात थोड्या फार प्रमाणात खेचाखेची झाली हे खरे आहे. बंडखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न व्हायला हवे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी बोलून येत्या दोन दिवसांत काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
-खासदार संजय राऊत, नेते, शिवसेना.

बॅट कुणाची…शिवसेनेची
नाशिकमध्ये शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे शहरातील सर्वच मतदारसंघांत येत्या काही दिवसांत भाजप-शिवसेनेमध्येच राजकीय कलगीतुरा रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वरवर युती असली तरी एकमेकांतील अंतर्गत लाथाळ्यांमुळे दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ होण्याची शक्यता वाढली आहे. राजीनाम्याच्या घोषणेसाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ‘ही बॅट कुणाची…शिवसेनेची…!!” ,”अब की बार…सीमा पार” अशा घोषणा देण्यात आल्याने नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष अटळ असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

- Advertisement -