मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोटांचा कट?

दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

हरियाणात पकडण्यात आलेल्या बब्बर खालसा खलिस्तानी संघटनेच्या 4 दहशतवाद्यांचे नांदेड कनेक्शन समोर येताच त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबीही पुढे येत आहेत. पाकिस्तानात लपून घातपात घडवणारा दहशतवादी हरविंदरसिंह रिंडा नांदेडमधील स्लीपर सेल कार्यरत करण्याच्या तयारीत होता. त्यानेच नांदेडमध्ये आरडीएक्सचा मोठा साठा पाठवला होता. या आरडीएक्सचा वापर करून मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा कट असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील बस्तारातून 4 दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. साधारण पाच ते सहा महिन्यांपूर्वी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे इनपुट तपास यंत्रणांना मिळाले होते. हा अलर्ट हरविंदरसिंह रिंडा याच्या बाबतीतच असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नांदेडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स पाठवण्यात आले, मात्र त्याची पुसटशीही कल्पना महाराष्ट्र एटीएसला मिळू शकली नाही. या आरडीएक्सचा वापर मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी तर होणार नव्हता ना, अशा शंका आता उपस्थित होत आहेत.

दहशतवादी हरविंदरसिंह रिंडानेच नांदेडमधील लोकांकडून जवळपास 200 कोटींची वसुली केली आहे. या पैशांचा उपयोग तो दहशतवादी कारवायांसाठी करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. सध्या रिंडा पाकिस्तानातील इस्लामाबाद शहरात असून यापूर्वी तो लाहोरमध्ये होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.