आव्हाडांच्या मुलीला जीवे मारण्याचा कट; ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करणाऱ्याची व्हिडिओ क्लिप समोर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यात मागील काही दिवसांपासून मोठा वाद सुरू आहे. महेश आहेर यांनी आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचला असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. तसेच त्यांनी याबाबतची एक ऑडिओ क्लिपही पोलिसांना दिली होती.

या संपूर्ण प्रकरणात आता जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक मोठा खुलासा करताना ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करणाऱ्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. महेश आहेर हे आव्हाडांच्या मुलीला जीवे मारण्याचा कट रचत असताना ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करणाऱ्या सुशांत सुर्वे नावाच्या तरुणाचा व्हिडीओ आव्हाडांनी ट्विटरवर शेअर केला आहे. संबंधित व्हिडीओतून सुशांत सुर्वे याने संबंधित ऑडिओ रेकॉर्डिंग मी स्वत: केली, असा दावा केला आहे.

संबंधित व्हिडीओ शेअर करताना जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हटले की, “सोबतचा व्हिडीओ हा सुशांत सुर्वे नावाच्या तरुणाने मला स्वतःहून दिलेला व्हिडीओ आहे. त्यामध्ये तो स्पष्टपणाने कबुल करतो की, महेश आहेर यांनी माझ्या मुलीबद्दल केलेले भाष्य आणि त्यांचे संपूर्ण रेकॉर्डिंग त्याने स्वतः केले होते. तसे त्याने प्रतिज्ञापत्रदेखील मला लिहून दिले आहे. यापेक्षा अजून कोणता पुरावा पाहिजे?” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी यावेळी केला आहे.

महेश आहेर यांच्याविरोधात इतके सगळे व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स बाहेर येत आहेत. मुख्यमंत्र्यांशी मी टाईट होऊन बोललो, असं मुख्यमंत्र्यांना अपमानित करणारे भाष्य आहेर यांच्या तोंडातून आलं. आहेर यांनी पोलिसांबद्दल देखील आक्षेपार्ह विधाने केली आहेत. त्यांची मार्कशीटही खोटी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एवढे सर्व पुरावे असतानाही कारवाई करण्यासाठी अजून किती पुरावे आपल्याला हवे आहेत?” असेही आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले.

एक हजार घर स्वतःच्या सहीने विकली
महेश आहेर यांनी जवळजवळ एक हजार घर स्वतःच्या सहीने विकली आहेत आणि आता ते बोलतात की, ही सगळी घर देण्यासाठी मी वरिष्ठांची परवानगी घेतली होती. म्हणजे एखाद्याने चोरी करायची आणि नंतर घरच्या सगळ्यांनाच त्याच्यामध्ये अडकवायचे, असा हा त्यांचा प्रकार असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी यांनी केला आहे. त्यामुळे पालिकेतील इतर कर्मचाऱ्यांना सावध करताना म्हटले की, आताच सावध राहा… सगळे आयुक्त तसेच आहेर यांच्या फाईलींवर सही करणारे सगळेच या प्रकरणामध्ये अडचणीत येणार आहेत. डोळे बंद करून सह्या करण्याचा हा भोग आहेर यांना भोगावा लागणार आहे.