‘हिमालय’ पुलाची उभारणी युद्धपातळीवर; तिसऱ्या स्तंभाचे काम पूर्णत्वाकडे

सीएसएमटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय परिसराला जोडणाऱ्या ‘ हिमालय’ पुलाच्या उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय या दोन ठिकाणी पुलाचा मुख्य आधार असलेल्या दोन स्तंभांची उभारणी पूर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे. तर तिसऱ्या स्तंभाचे काम ५० टक्के पूर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे लवकरच पुलाची उभारणी होऊन पादचार्यांना हा पूल वापरायला उपलब्ध होणार आहे.
१४ मार्च रोजी २०१९ रोजी ‘ हिमालय’ पुलाचा मोठा भाग अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली होती.

या दुर्घटनेत त्यावेळी ७ जण मृत तर ३० जण जखमी झाले होते. त्यानंतर सदर पुलाचे उर्वरित बांधकाम हे पूर्णपणे पाडण्यात आले होते. मात्र तेंव्हापासून सदर पूल उभारणीला विविध कारणास्तव मोठा विलंब झाला. काही तांत्रिक अडचणी, पुलाच्या डिझाईनमधील बदल, पावसाळा आदी कारणांस्तव ह्या पुलाच्या उभारणीच्या कामाला अडीच वर्षे विलंब झाला. तसेच, पुलाच्या उभारणीचे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यामुळे विविध कारणास्तव पुलाचे बांधकाम रखडले होते. मात्र अखेर सर्व अडथळे दूर झाल्याने पुलाच्या बांधकामाला खऱ्या अर्थाने जानेवारी २०२२ पासून सुरुवात झाली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यँत तरी या पुलाच्या पाया उभारणीच्या कामाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत टाइम्स ऑफ इंडिया व सीएसएमटी रेल्वे स्थानक या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक याप्रमाणे दोन स्तंभ उभारण्यात आले आहेत. तर अंजुमन, जे.जे. आर्ट दिशेला आणखीन एका आधारभूत स्तंभाचीही उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे.

मात्र या तिसऱ्या स्तंभाचे काम जवळजवळ ५० टक्के इतके पूर्ण झाले आहे. या पुलाच्या बांधकामात सिमेंट, स्टील, लोखंड यांचा वापर करण्यात येणार आहे. ह्या पुलाची लांबी ३० मिटर व रुंदी ९ मिटर इतकी असणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजे ११ कोटी रुपयांपर्यन्त खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच, पुलाची उभारणी करताना डीएन रोडवरील वाहतुकीला जास्त अडथळा होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.

एकदा या पुलाच्या आधारभूत स्तंभांचे काम पूर्ण झाले की मग फक्त या स्तंभांवर पादचाऱ्यांना चालण्यासाठी आवश्यक असलेला भाग टाकून दोन्ही स्तंभांना जोडण्याचे काम सुरू करण्यात येईल. डिसेंबर २०२२ पर्यन्त तरी या पुलाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. जर या पुलाचे काम वेळीच पूर्ण झाल्यास पादचाऱ्यांना चालण्यासाठी तो उपलब्ध होईल.


हेही वाचा : मतपत्रिकांचा वाद आयोगाच्या दरबारी