तोकड्या जागेवर कंटेनर अंगणवाडीचा पर्याय

कांदिवलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्या अंगणवाडीचे उद्घाटन

मुंबईमधील अंगणवाडी केंद्र प्रामुख्याने झोपडपट्टी क्षेत्रातील रहिवाशांच्या घरात भाड्याने चालविण्यात येतात. घरांचे क्षेत्रफळ छोटे असल्याने लहान मुलांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात. तोकड्या जागेवर पर्याय म्हणून कंटेनरमध्ये अंगणवाडी सुरू करण्याची संकल्पना माहिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडली आहे. त्यानुसार कांदिवली पूर्वेकडील जानुपाडा परिसरात अंगणवाडी क्र. १०५ चे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आले. कंटेनर अंगणवाडी ठेवण्याकरिता आणखी २४९ रिकाम्या जागा शोधण्यात आल्या आहेत. येथेही नव्याने कंटेनर अंगणवाड्या सुरू करण्यात येतील.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कंटेनर अंगणवाडीप्रमाणेच विभागामार्फत अंगणवाड्या दत्तक योजनेंतर्गत सुविधांयुक्त अंगणवाड्या उपलब्ध होत असून बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही उत्तम सुविधा आहे. मुंबईसारख्या ठिकाणी कंटेनर अंगणवाडी ही सुविधा माता, बालकांसाठी वरदान ठरेल. बालकांच्या पोषण-संगोपनात अंगणवाडीचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाला राज्यभरातील सर्व अंगणवाड्या दर्जेदार करायच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाड्यांकडे लक्ष देण्याची सूचना केली असून अंगणवाडी दत्तक योजनेच्या माध्यमातून अंगणवाड्यांची गुणवत्ता आणि सुविधा वृद्धिंगत करता येतील. भावी पिढी सुदृढ होण्यासाठी अंगणवाड्यांची भूमिका महत्त्वाची असून महिला व बालकांच्या विकासासाठी विभाग सक्रियपणे काम करीत असल्याचेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

४० अंगणवाडी केंद्रे दत्तक
राज्यातील अंगणवाडी केंदांच्या बळकटीकरणाकरिता सीएसआर, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांना शैक्षणिक सुविधा, वृद्धी संनियंत्रण साहित्य वाटप, प्रशिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य तपासणीकरिता साह्य आदी बाबींचा अंगणवाडी दत्तक योजनेत समावेश आहे. यामध्ये राज्यात एकूण ३६५६ अंगणवाडी केंद्रे विविध कंपन्या, सामाजिक संस्था यांनी ऑक्टोबर २०२२ पासून आजपर्यंत दत्तक घेतली आहेत. भव्यता फाऊंडेशन यांनी यापूर्वी ५ अंगणवाडी केंद्रे दत्तक घेतली असून एकूण ४० अंगणवाडी केंद्रे दत्तक घेतली आहेत. यामध्ये नाशिक ५, पालघर ५, गडचिरोली ९, चंद्रपूर १, धुळे १, नंदुरबार १, औरंगाबाद १५, रायगड २, रत्नागिरी १ यांचा समावेश आहे.

जागेची टंचाई असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासारख्या ठिकाणी कंटेनर अंगणवाड्या ही उपयुक्त संकल्पना महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असून बालके आणि पालकांसाठी ही अंगणवाडी निश्चितच सहायक ठरेल.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री