घरमहाराष्ट्रघाबरू नका; व्हायरस असलेल्या पोलिओ लसीचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही

घाबरू नका; व्हायरस असलेल्या पोलिओ लसीचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही

Subscribe

व्हायरस असलेली पोलिओ लस महाराष्ट्रात वितरीत करण्यात आलेली नाही, असा खुलासा आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केला आहे.

पोलिओ लसींच्या उत्पादनात ‘टाईप टू’ विषाणू आढळला असला तरी त्या कंपनीच्या बॅचचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही, असे केंद्र शासनाच्या लसीकरण विभागाने स्पष्ट केले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज दिली. दरम्यान, उद्या दिल्ली येथे याबाबत उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले की, भारतामध्ये जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय गुणवत्तेनुसार पोलिओच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करत असून त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रासह अन्य राज्यातील ४५ ठिकाणांहून सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. देशातील पाच मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये ते तपासण्यात आले असून सांडपाण्यासोबतच विष्ठा नमुने देखील नियमितपणे तपासण्यात येतात.

दरवर्षी साधारणतः ७५ हजार विष्ठा नमुने तपासण्यात येतात. पोलिओ लसीकरणांतर्गत करण्यात आलेल्या लसीकरणामुळे बालकांना कुठल्याही प्रकारच्या जोखीमीचे प्रमाण कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत असून ज्या कंपनीच्या पोलिओ लसीच्या उत्पादनात हा विषाणू आढळून आला त्याचा वापर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यात थांबविण्यात आला आहे, असेही आरोग्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

भारतामध्ये शेवटचा पोलिओ रुग्ण दि. १३ जानेवारी २०११ मध्ये सापडला होता, त्यानंतर तीन वर्ष एकही रुग्ण दाखल झाला नाही, त्यामुळे २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेतर्फे भारताला पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आले. मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील काही भागांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात सांडपाणी आणि विष्ठा नमुन्यांमध्ये पोलिओच्या ‘टाईप टू’चे विषाणू सापडले. याबाबत केलेल्या छाननीअंती हे विषाणू पोलिओ टाईप २ लसीमध्ये आढळल्याचे निदर्शनास आले आहे.

टाईप टू पोलिओ विषाणू आढळल्यानंतर केंद्र शासनाच्या चमूने तपासणी केलेली असून त्यात एका कंपनीने तयार केलेल्या b OPV च्या कुप्यांमध्ये टाईप दोन प्रकारच्या लसीत विषाणू आढळून आला. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीचा वापर थांबण्याचा निर्णय १० सप्टेंबर रोजी घेतला आहे. त्यानुसार राज्यातही दिनांक ११ सप्टेंबर पासून या लसीचा वापर थांबविण्यात आलेला आहे. केंद्र शासन हा विषय जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने गांभीर्याने हाताळत आहे. राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -