शिंदे मंत्रिमंडळात वादग्रस्त राठोड, सत्तारांचा समावेश; उत्तर महाराष्ट्राला झुकते माप

आजच्या विस्तारात शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. आज शपथ घेतलेले १८ जण कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र, या १८ मंत्र्यांच्या यादीत एकाही महिला सदस्याचा समावेश नाही

bjp want shinde group mps constituencies BJPs Lok Sabha Constituency Travel Plan

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी ठाकरे सरकारमध्ये असताना भाजपच्या मागणीवरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड आणि शिक्षक पात्रता घोटाळ्यात स्वतःच्या मुलींची प्रमाणपत्रे रद्द झाल्याने अडचणीत सापडलेले अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या हाती आयते कोलीत दिले आहे. राठोड यांच्या समावेशावरून भाजपच्या चित्रा वाघ यांनी घरचा आहेर देत शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अपशकुन केला आहे.

तब्बल ४० दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर एकनाथ शिंदे सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्‍तार मंगळवारी अखेर पार पडला. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्‍या या मंत्रिमंडळ विस्‍तारात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आजच्या विस्तारात शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. आज शपथ घेतलेले १८ जण कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र, या १८ मंत्र्यांच्या यादीत एकाही महिला सदस्याचा समावेश नाही.

मंत्रिमंडळात मुंबईतून मंगल प्रभात लोढा तर ठाणे जिल्ह्यातून रवींद्र चव्हाण यांना संधी मिळाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला झुकते माप मिळाले आहे. उत्तर महाराष्ट्रातून राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, डॉ. विजयकुमार गावित, दादाजी भुसे आणि गुलाबराव पाटील यांना तर मराठवाड्यातून संदीपानराव भुमरे, डॉ. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांचा समावेश झाला आहे.

पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेसजनांना संधी

भाजपने राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. विजयकुमार गावित तर शिंदे गटाने उदय सामंत, दीपक केसरकर या पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेसजनांना मंत्रिमंडळात संधी दिली. विखे पाटील हे मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री झाले. त्यानंतर ते कॉंग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री आणि विरोधी पक्षनेते होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विखे भाजपमध्ये दाखल झाले होते. आज त्यांनी सर्वप्रथम मंत्रिपदाची शपथ घेतली.

डॉ. विजय कुमार गावित हे १९९९ पासून राष्ट्रवादीत होते. संजय गांधी निराधार योजनेतील गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे वादात सापडलेल्या गावित यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना यावेळी संधी दिली आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर हे दोघेही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते विधासभेवर निवडून आले होते.

आज मंत्री म्हणून पहिली शपथ राधाकृष्‍ण विखे-पाटील यांनी घेतली. त्‍यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन यांना शपथ देण्यात आली. त्‍यानंतर क्रमाने शिंदे गटातील गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्‍दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई आणि शेवटी मंगलप्रभात लोढा यांनी शपथ घेतली.

महिला मंत्री नाही

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ  विस्‍तारात महिला मंत्र्यांचा  समावेश होईल,अशी चर्चा होती. त्यात भाजपाकडून देवयानी फरांदे, सीमा हिरे, माधुरी मिसाळ यांची नावे चर्चेत होती. मात्र, पहिल्या १८ मंत्र्यांच्या यादीत त्यांचा समावेश होऊ शकला नाही.

संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रवीण दरेकर, बावनकुळे यांचा पत्ता कट

मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट आणि रायगड जिल्ह्यातील महाडचे आमदार भरत गोगावले यांचा समावेश जवळपास नक्की मानला जात होता. शिरसाट हे सुरुवातीपासून शिंदे यांच्या जवळचे आहेत. मात्र,अब्दुल सत्तार यांच्या समावेशामुळे शिरसाट यांचे नाव मागे पडले. तर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद असलेल्या गोगावले यांना मंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता. मात्र, शब्द पाळला न गेल्याने गोगावले नाराज असल्याचे समजते. उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या सर्वांचा समावेश शिंदे यांनी मंत्रिमंडळात केला आहे. तर भाजपने मंत्रिपदाचे दावेदार असलेल्या प्रवीण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना पहिल्या विस्तारात स्थान दिलेले नाही.  दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची खात्री होती. मात्र, भाजप मंत्र्यांच्या यादीत त्यांचा समावेश होऊ शकला नाही. तर भाजपने मुंबई महापलिका निवडणुकीची जबाबदारी सोपवलेल्या आशीष शेलार यांना भाजपने ‘मिशन मुंबई’साठी मोकळे सोडले आहे.

भाजपच्या यादीवर फडणवीस यांची छाप

भाजपच्या ९ मंत्र्यांच्या यादीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छाप दिसते. केवळ फडणवीस यांच्या आग्रहामुळेच राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. विजय कुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.

भाजप पक्ष संघटनेच्या नेतृत्वात बदल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा  यांचा मंत्रिमंडळात  समावेश झाल्याने नजीकच्या काळात भाजपकडून पक्ष संघटनेत बदल अपेक्षित आहे. या बदलात चंद्रशेखर बावनकुळे, आशीष शेलार, राम शिंदे यासारख्या नेत्यांना संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

आज शपथ घेतलेले मंत्री

भाजप : राधाकृष्‍ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, डॉ.विजयकुमार गावित, सुरेश खाडे, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा

शिंदे गट : गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, संदीपानराव भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई