नागपूर : धीरेंद्र शास्त्री महाराज अर्थात बागेश्वर बाबा हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे ते अनेकदा अढचणीतही सापडले आहेत. त्यांनी नुकतेच भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे प्रवचनातून जुमदेव बाबा यांच्या भक्ती आणि कार्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. यानंतर नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. जुमदेव बाबा यांच्या हजारो सेवकांकडून बागेश्वर बाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता बागेश्वर बाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Controversial statements cost Bageshwar Baba Filed a case)
हेही वाचा – VBA : गडकरींचा पराभव होणार असल्याने नाना पटोले दुःखी; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप
जुमदेव बाबा आणि परमात्मा एक सेवकांबद्दल भावना दुखावणारे वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे प्रवचनातून केले होते. याप्रकरणी आता हजारो सेवकांच्या तक्रारीनंतर बागेश्वर बाबा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सेवकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी बागेश्वर बाबा यांच्या विरोधात भंडाऱ्याच्या मोहाडी पोलीस ठाण्यात 295 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती बागेश्वर बाबांना अटक करण्यात येईल, असं आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सेवकांना दिलं आहे.
दरम्यान, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बागेश्वर महाराजांविरुद्ध गुन्हे दाखल करून दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांना अटक करावी आणि सुरू असलेला त्यांचा कार्यक्रम बंद करावा. अन्यथा बाबा जुमदेव महाराजांचे सेवक कायदा हातात घेवून बागेश्वर महाराजांना अद्दल घडवतील. यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा दिला होता. मात्र 4 वाजेपर्यंत बागेश्वर बाबा यांच्याविरोधात गुन्हा दाखल न झाल्यामुळे आमदार नरेंद्र भोंडेकर हे आपल्या असंख्य सेवक आणि कार्यकर्त्यांसह मोहाडीत जाण्यासाठी निघाले. मात्र पोलिसांनी त्यांना वाटेत थांबवून ताब्यात घेतले आहे. तर संतप्त सेवकांनी पोलीस ठण्यासमोर ठाण मांडला आहे. त्यामुळे पोलिसांनी याठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
हेही वाचा – BharatRatna : राष्ट्रपती एका गरीब आदिवासी समाजातील असल्याने…; मोदींच्या कृतीवर विरोधकांचा हल्लाबोल
बागेश्वर बाबा जुमदेव बाबांबद्दल नेमकं काय म्हणाले?
प्रवचनादरम्यान बागेश्वर बाबा म्हणाले की, मला कोणी तरी सांगितलं की या भागात एक वेगळा संप्रदाय आहे. ते लोक हनुमानाला मानतात. पण ते आपल्या आई-वडिलांना मानत नाही, प्रभू श्रीरामांना मानत नाहीत आणि राम राम म्हणत नाहीत. मला त्यांच्याशी काही वैर नाही. त्यांच्या श्रद्धेला माझा प्रणामच आहे. परंतु इतकं म्हणू शकतो की, ते हनुमान भक्त राहू शकत नाही, जोपर्यंत ते रामाचं नाव घेत नाही. असा कोणी हनुमानांचा सेवक होऊ शकत नाही जो धर्मविरोधी परंपरा जपू शकतो. तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल, पण मी सत्य बोलायला चुकणार नाही, कारण मी बाबरच्या छातीवर सुद्धा रघुवरांच नाव घेतल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी केलं होतं.