घरताज्या घडामोडीएससी-एसटी आरक्षणाच्या मुदतवाढीवर विधानपरिषदेत गदारोळ

एससी-एसटी आरक्षणाच्या मुदतवाढीवर विधानपरिषदेत गदारोळ

Subscribe

अनुसूचित जाती आणि जमातीला लोकसभा आणि विधानसभेत राखीव जागा ठेवण्यासंबंधी घटनेतील अनुच्छेद ३६८ मध्ये सुधारणेच्या विधेयकाला आज विधानसभा आणि विधानपरिषदेत मंजुरी देण्यात आली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी घटनेतील या १२६ व्या सुधारणेला आधीच समंती दिलेली आहे. मात्र विधानपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधेयक मांडल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. विधेयकावर बोलत असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संविधान सभेतील माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे वक्तव्य वाचून दाखवले त्याला काँग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. या गदारोळात एकदा विधानपरिषद तहकूब करावी लागली होती.

हे विधेयक विधानपरिषदेत मांडतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये अनुसूचित जाती-जमातीला प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करुन ठेवली आहे. या विधेयकाचे समर्थन करुन आपण सर्वांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा. त्यानंतर बोलताना विरोधी पक्षनेते म्हणाले की, एससी / एसटी समाजाला आरक्षण देऊनही ७० वर्ष झाले तरी अद्याप त्यांचा विकास झालेला नाही. तर संविधान सभेत बोलत असताना माजी पंतप्रधान नेहरूंनी, आरक्षणामुळे प्रशासनाची कुवत कमी होईल, असे वक्तव्य केले असल्याचे सांगितले. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणाची चुकीची कॉपी केली असल्याचे कपिल पाटील म्हणाले. तसेच भाई जगताप, भाई जगताप, शरद रणपिसे, हेमंत टकले यांनी आक्षेप घेत दरेकर यांचे वक्तव्य रेकॉर्ड वरुन काढण्याची विनंती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना केली. तसेच यावेळी सभागृहातील इतर सदस्यांनीही विधेयकावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सभापतींनी त्याला मंजूरी दिली नाही. त्यानंतर हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -