मतपत्रिकांचा वाद आयोगाच्या दरबारी

Election Commission

राज्यसभा निवडणुकीतील (Rajya Sabha Elections) मतदानाचा वाद भारत निवडणूक आयोगापर्यंत पोहचला असून भाजप आणि काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपांवर निर्णय होईपर्यंत राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी खोळंबली होती.

महाविकास आघाडी आणि भाजपने परस्परांच्या मतदानाविरोधात निवडणूकआयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेच्या सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेत त्यांची मते बाद करण्याची मागणी केली तर महाविकास आघाडीने भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांची मते बाद करण्याची मागणी केली. दोन्ही बाजूकडच्या या मागण्यांमुळे निवडणूक आयोगाने सुनावणी होईपर्यंत मतमोजणीला स्थगित ठेवली.

राज्यसभा निवडणुकीत मतदान करून मतपत्रिका पक्षाने नेमलेल्या प्रतिनिधीला दाखवावी लागते. मात्र, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आक्षेप भाजपच्या पराग अळवणी यांनी घेतला आहे. त्यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनीही आक्षेप घेऊन या दोघांची मते बाद करण्याची मागणी केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळल्याने भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

हेही वाचा : ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

महाविकास आघाडीकडूनही भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांच्या विरोधात आक्षेप घेण्यात आला मुनगंटीवार यांनी निवडणूक प्रतिनिधी व्यतिरिक्त इतर व्यक्तीला मतपत्रिका दाखवल्याचा तर रवी राणा यांनी हनुमान चालिसा विधानभवनाबाहेर दाखविल्याचा आक्षेप महाविकास आघाडीचा आहे.आघाडी तसेच भाजप दोघांनीही परस्परांविरोधात तक्रारी केल्या आहेत. निवडणूक आयोगाने तक्रारी ऐकून घेईपर्यंत मतमोजणीला स्थगिती दिल्याने मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होऊ शकली नव्हती.

दरम्यान,शिवसेना नेते आणि निवडणुकीतील उमेदवार संजय राऊत यांनी ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू झाला.आम्हीच जिंकू अशा शब्दांत भाजपवर टीकास्त्र सोडले.तर रवी राणा यांनी हनुमान चालिसाचे पुस्तक खिशातून घेउन जाणे हा गुन्हा आहे का? असा सवाल केला आहे.


हेही वाचा : रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवारांचे मत बाद करा, शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार