कोरोनातही थाळीवरून राजकीय चढाओढ; शिवभोजन, शरद थाळीनंतर आता कोकणात कमळ थाळी!

राज्य सरकारच्या शिवभोजन थाळीनंतर राष्ट्रवादीने पुण्यात शरद थाळी सुरू केली आहे. आता या दोन थाळ्यांना टक्कर देण्यासाठी भाजपची कमळ थाळी आली असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी ही थाळी कणकवलीमध्ये सुरू केली आहे.

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, राजकिय नेते मात्र या संकटाच्या काळात देखील राजकारण करताना दिसत आहेत. कुणी कुणावर टीका करत आहे तर कुणी कुणाला टक्कर देत आहेत. आता थाळीवरून देखील राजकीय चढाओढ पहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या शिवभोजन थाळीनंतर राष्ट्रवादीने पुण्यात शरद थाळी सुरू केली आहे. आता या दोन थाळ्यांना टक्कर देण्यासाठी भाजपची कमळ थाळी आली असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी ही थाळी कणकवलीमध्ये सुरू केली आहे.

नितेश राणेंची ‘कमळ’थाळी विनामूल्य 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे राज्य सरकार ५ रुपयांमध्ये शिवभोजन थाळी देत असताना नितेश राणे यांनी कमळ थाळी विनामूल्य ठेवली आहे. कणकवली शहरामध्ये नगरपंचायतीच्या सहकार्याने  बुधवारपासून दररोज १५० लोकांसाठी ‘कमळ’ थाळी देण्यात येणार असल्याची घोषणा नितेश राणे यांनी केली आहे. विशेष म्हणजे या थाळीसाठी एकही रुपया मोजावा लागणार नाही. ही थाली विनामुल्य असणार आहे. कोरोना संकटाच्या काळात गरिबांना ”कमळ” थाळीमुळे नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

अशी असेल ‘कमळ’ थाळी 

नितेश राणे यांनी सुरू केलेल्या या थाळीमध्ये २ मूद भात, २ चपाती, १ वरण / डाळ ( आमटी ), १ भाजी या पदार्थांचा समावेश असणार आहे. हे केंद्र लक्ष्मी विष्णू हॉल, विद्यानगर ( संजीवन हॉस्पिटलजवळ) येथे सुरु करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत याठिकाणी १५० थाळी देण्यात येणार आहेत.

पुण्यात राष्ट्रवादीची शरद थाळी 

कोरोनाने महाराष्ट्रात कहर केलाय. लॉकडाऊनमुळे गरीबांचे हाल होत आहेत. दररोज मजुरी करून भोजन करणाऱ्यांना मोठा तडाखा बसला आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शिव भोजन योजना कार्यरत असल्याचा दावा राज्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार करत आहेत. शिव भोजन योजनेसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात सबसिडी देखील महाविकास आघाडी सरकार देत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने शरद भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने शरद भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना विषाणू लाॅकडाऊनमुळे गोरगरीब उपासमार होऊ नये, यासाठी शरद भोजन योजना आणल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.