Corona Crisis: घरी स्थानबद्ध केलेल्या रुग्णांना ओळखण्यासाठी बोटांना शाई लावणार

coronavirus in india
करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना

राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून आता ३८ रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तसेच परदेशातून येणाऱ्या नागरिकांचे अ, ब, क असे तीन ग्रुप तयार करून त्यांच्यावर उपचार करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले. तसेच ज्या संशयित रुग्णांना घरीच स्थानबद्ध करण्यात आले आहे, त्यांची ओळख पटावी म्हणून मतदान केल्यानंतर ज्या प्रमाणे बोटाला शाई लावली जाते, त्याप्रमाण संशयित रुग्णांच्या हातावर शाई लावणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

टोपे यांनी सांगितले की, परदेशातून येणाऱ्यांचे तीन गट केले जाणार आहेत. करोनाची स्पष्ट लक्षणे असलेल्या नागरिकांना गटात टाकले जाणार आहे. या गटातील रुग्णांवर तात्काळ उपचार केले जातील. मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांची पार्श्वभूमी असलेल्या वयोवृद्ध नागरिकांना गटात टाकले जाणार आहे. तर गटात ज्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसत नाहीत अशा तरुण मुलांचा समावेश केला जाणार आहे. या तरुणांना ३१ मार्चपर्यंत घरीच स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

घरीच स्थानबद्ध केलेले रुग्ण बाहेर जाऊ नयेत, यासाठी आरोग्य विभागाकडून एक वेगळीच शक्कल लढविण्यात येणार आहे. अशा रुग्णांच्या हातावर शाईचा शिक्का मारण्यात येईल. जेणेकरुन हे रुग्ण बाहेर पडल्यास त्यांना ओळखणे शक्य होईल आणि पुन्हा घरी जाण्यास सांगितले जाईल.

रेल्वेमध्ये रोज लाखो लोक प्रवास करतात. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या बैठकीला बोलावण्यात आले होते. दिवसातून एकदा तरी रेल्वेचे निर्जंतुकीकरण करावे, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. तसेच रेल्वेतील प्रसाधनगृहात हँड सॅनिटायझर ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.