कोरोना आर्थिक घोटाळा प्रकरण, आयुक्तांची ईडीकडून आज चौकशी होणार

iqbal singh chahal demanded inquiry into commissioners of all municipal corporations in maharashtra

मुंबई: मुंबई महापालिकेकडून कोरोना महामारी काळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चात घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत ईडीकडून मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांची सोमवारी चौकशी होणार आहे. या चौकशीला आयुक्त स्वतः उपस्थित राहणार की आजारपणाचे अथवा अन्य काही कारण सांगून गैरहजर राहणार हे सोमवारी चौकशीप्रसंगी स्पष्ट होणार आहे.

मात्र मुंबई महापालिकेच्या इतिहासात कोरोनासाठी झालेल्या खर्चाप्रकरणी दस्तुरखुद्द आयुक्तांची चौकशी होणार असल्याने तसे झाल्यास या चौकशीची नोंद होणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. तब्बल दोन वर्षांपासून कोरोनाचा मुंबईत मुक्काम आहे. प्रारंभी कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना माहिती नव्हती. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत खूप वाढ झाली होती. त्यामुळे कोरोनाचे अनेक बळी गेले. मात्र नंतर जागतिक आरोग्य संघटना व देशातील वैद्यकीय तज्ज्ञांची टीम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात व मुंबईतही कोरोनाची पहिली, दुसरी लाट परतवून लावण्यात आणि कोरोनाची तिसरी लाट रोखण्यातही चांगले यश आले.

मात्र मुंबईत पालिका प्रशासनाने कोरोनावरील प्रतिबंधक उपाययोजना म्हणून विविध ठिकाणी कोरोना जंबो सेंटर, क्वारंटाईन सेंटर, ऑक्सिजन सुविधा यांची उभारणी, रुग्णालयात, कोरोना सेंटर येथे कमतरता भासल्याने तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, नर्स, कामगार, सफाई कामगार आदींची कंत्राटी तत्वावर नेमणूक करणे, औषध, उपकरणे यांसाठी तब्बल पाच हजार कोटींचा खर्च करण्यात आला. मात्र या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा संपूर्ण हिशोब पालिकेकडून सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे पालिका प्रशासन, आयुक्त, संबंधित अधिकारी व पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी शिवसेना पक्ष यांच्यावर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तर सर्वात अगोदर मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोनाचे कंत्राटकाम मुलाच्या कंपनीला मिळवून दिल्याचा गंभीर व खळबळजनक आरोप केला होता. मात्र माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी, सदर आरोप फेटाळून लावले होते. तर आयुक्त कोरोनावरील खर्चाचा वेळोवेळी व संपूर्ण हिशोब देत नसल्याचा गंभीर आरोप त्यावेळी अस्तित्वात असलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत व पालिका सभेत भाजप व विरोधी पक्षाच्या गटनेते व नगरसेवकांकडून करण्यात आले होते. मात्र त्यावेळी पालिकेने कोरोनावरील काही बाबतीत केलेल्या खर्चाचा हिशोब सादर केला मात्र त्याने सर्वपक्षीयांचे समाधान झाले नव्हते. पालिकेने आजपर्यंत कोरोनावरील खर्चाबाबत संपूर्ण हिशोब आजपर्यंत सादर केलेला नाही.

दरम्यान, राज्यात राजकीय भूकंप होऊन सत्तापरिवर्तन झाले. त्यानंतर कोरोनावरील खर्चात झालेल्या भ्रष्टाचाराबाबतच्या आरोपांची गंभीर दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळात महापालिकेने केलेल्या खर्चाबाबत चौकशी करण्याची घोषणा केली. तर कॅगकडूनही गेल्या काही दिवसांपासून पालिकेने केलेल्या विकास कामावरील खर्चाबाबत व कामांबाबत चौकशी सुरू केली आहे. तर ‘ईडी’ नेही या सर्व घटना घडत असताना त्यात अचानकपणे उडी घेत पालिकेचे वरिष्ठ अधिकारी म्हणून पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे चौकशी करून अखेर त्यांना चौकशीबाबत नोटीस बजावल्याचे समजते. त्यामुळे आता त्यांना सोमवारपासून ‘ईडी’ च्या कार्यालयात चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

मात्र पत्रकारांनी याप्रकरणी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ‘ नो आयडिया’ असे एका ओळीचे उत्तर देत हात वर केले आहेत. आता सोमवारी ‘ ईडी: च्या कार्यालयात सकाळपासून काय होणार व आयुक्त चौकशीला सामोरे जातील का, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र जर या कोरोना खर्चाबाबत झालेल्या आरोपामागे राजकारण असेल तर आयुक्तांसोबतच तत्कालीन सत्ताधारी शिवसेना पक्ष ( उद्धव ठाकरे गट) व या पक्षाचे नेते यांना गोवले जाण्याची चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे.