2 वर्षांनंतर कोरोना निर्बंधांपासून दिलासा!

केंद्र सरकारची मोठी घोषणा, 31 मार्चपासून निर्बंध शिथिल, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार

देशात कोरोना संसर्गाचा प्रसार आटोक्यात आल्याने तब्बल 2 वर्षांनंतर केंद्र सरकारने कोविड-१९ संदर्भात लादण्यात आलेले निर्बंध ३१ मार्चपासून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत (2005) लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. हे निर्बंध हटवतानाच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

देशात कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने मार्च २०२०पासून अनेक निर्बंध लादले होते, परंतु कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर आता कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने केंद्र सरकारने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

निर्बंध हटवण्याचा निर्णय घेत असताना आरोग्य मंत्रालयाने स्थानिक परिस्थितीनुसार प्रशासनाला काही अधिकार दिले आहेत. एखाद्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यास विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित राज्य आपल्या पातळीवर निर्णय घेऊ शकते, असा सल्लाही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

सध्या देशात 23 हजार 913 कोरोनाचे रुग्ण आढळत असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 0.28 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 181.56 कोटी डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.

नवे आदेश लागू होणार नाहीत?
केंद्रीय मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 25 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या आदेशांचा कालावधी संपल्यानंतर कोरोनासंदर्भात कोणतेही नवीन आदेश लागू करण्यात येणार नाहीत, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच भविष्यात पुन्हा कोरोनाचे संकट डोके वर काढू नये यासाठी काय करावे हे सांगण्यासाठी आवश्यकतेनुसार वेळोवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना सल्ला दिला जाणार आहे.

चौथ्या लाटेचे काय?
आयआयटी कानपूरच्या अभ्यासात जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु देशात लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने चौथी लाट आलीच तरी ती सौम्य असेल. कोरोनाबाधित रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे अथवा मृत्यूचे प्रमाण खूप कमी असेल, असे म्हटले जात आहे. केवळ कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटचा धोका कायम असेल.