Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश केंद्र सरकारकडून सर्वोतोपरी मदत अदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण

केंद्र सरकारकडून सर्वोतोपरी मदत अदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

देशभरात लसीकरणावरून मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरू आहे. लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये लसीकरण थांबले आहे. त्यातच सिरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसींसाठी केंद्र सरकारने पैसे भरून बुकिंगच केले नाही, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी सोमवारी प्रसिद्ध केले होते. त्यावरून देशात एकच खळबळ उडाली असताना केंद्र सरकारने प्रसिद्धपत्रक काढून मे, जून, जुलै महिन्यांसाठी आगाऊ पेैसे देऊन लसींचे बुकींग अगोदरच करण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. त्यानंतर सिरमचे प्रमुख अदर पूनावाला यांनी आम्हाला सरकारकडून सर्वोतोपरी मदत मिळत असून केंद्र सरकारने आगाऊ पैसे देऊन लसींचे बुकींग केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

पुण्यात लॅब असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटने कोविशील्ड या लसीचे निर्माण केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सिरम आणि सिरमचे प्रमुख अदर पूनावाला यांच्याबद्दल उलटसुलट बातम्या येत आहेत. केंद्र सरकारने अदर पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा देऊ केल्यानंतर त्यावरून राजकारणही रंगले. त्यातच अदर पूनावाला हे लंडनला जाऊन बसले असून त्यांनी टाईम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला एका बड्या राजकीय नेत्याकडून धमक्या येत असल्याचे जाहीर केले. सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल यासंदर्भात मी कोणाचे नाव घेतले किंवा उत्तर दिले तर माझा शिरच्छेद केला जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अदर पूनावाला यांना सुरक्षा दिलीच कशाला, असा आक्षेप घेतला. त्यामुळे राज्याचे राजकारण तापले असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी आपल्याला तो नेता कोण, हे माहीत असल्याचे सांगत त्यात तेल ओतले.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी देशातील वृत्तवाहिन्यांवर पूनावाला यांचा हवाला देत, केंद्र सरकारने लसींचे बुकिंग केले नाही. तसेच त्याचे आगाऊ पैसे भरले नाही, असे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याबरोबर केंद्र सरकारने प्रसिद्धीपत्रक काढून मे, जून, जुलै महिन्यांच्या लसींचे बुकिंग केले असून त्याचे आगाऊ १७३२.५ कोटी हे सिरम इन्स्टिट्यूटला ११ कोटी डोससाठी तर ७८७.५ कोटी भारत बायोटेकला ५ कोटी डोससाठी आगाऊ देण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अदर पूनावाला यांनी ट्विट करत आम्हाला सरकारकडून आवश्यक ती मदत मिळत असल्याचे सांगितले.

माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. त्यामुळे स्पष्टीकरण देत आहे. लस निर्मिती एक प्रक्रिया असून एका रात्रीत उत्पादन वाढवणे शक्य नाही, हे आपल्याला समजले पाहिजे. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे. सर्वांसाठी पुरेसे डोस तयार करणे सोपे नाही. अगदी विकसित देशातील कंपन्याही संघर्ष करत आहे, असे पूनावाला यांनी ट्विट केलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

गेल्या एप्रिल महिन्यापासून आम्ही सरकारसोबत काम करत आहोत. आम्हाला सरकारकडून शास्त्रज्ञ, नियोजन आणि आर्थिक पातळीवर सहकार्य मिळत आहे. आतापर्यंत आम्हाला २६ कोटींहून अधिक डोससाठी ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यापैकी १५ कोटींहून अधिक डोस आम्ही पुरविले आहेत. तर पुढच्या ११ कोटी डोससाठी आम्हाला १०० टक्के आगाऊ रक्कमदेखील मिळाली आहे. त्यामुळे लवकरच राज्य आणि खासगी रुग्णालयांना डोस पुरविले जातील. आम्हाला माहिती आहे प्रत्येकाला लस मिळावी असे वाटत आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही ती मागणी पूर्ण करू आणि कोरोनाविरुद्धचा लढा लढू, असे पूनावाला यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -