Monday, May 3, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Update : आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा नको! देवेंद्र फडणवीस यांचे...

Corona Update : आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा नको! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना कमी व्हावा, ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, संसर्ग दर १५ टक्क्यांच्या पुढे असताना कोरोना कमी होतोय, असे आभासी चित्र तयार करणे योग्य होणार नाही, असे फडणवीस पत्रात म्हणतात.

Related Story

- Advertisement -

कोरोनाचे भय वाढणार नाही याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि मृतांची अचूक संख्या यातूनच कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सांगितले आहे. तसेच कोरोना चाचण्या, त्यातही आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा, अशी सुचनाही फडणवीस यांनी या पत्रात केली आहे.

गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा कमी संख्येने चाचण्या केल्या जात असल्याबद्दल मी संपूर्ण आकडेवारीसह सातत्याने आपणाशी पत्रव्यवहार केला होता. आज दुसर्‍या लाटेची तीव्रता अधिक असताना पुन्हा एकदा काही बाबी आपल्या निदर्शनास आणून देणे, हे मी माझे कर्तव्य समजतो. मुंबईत गेल्या आठ दिवसांत अतिशय कमी चाचण्या झाल्या आहेत, ज्याची सरासरी ४० हजार ७६० इतकी आहे, असे फडणवीस या पत्रात म्हणाले.

- Advertisement -

नागपूर जिल्ह्यात ४० लाख लोकसंख्येत मागील आठ दिवसांत सरासरी २६ हजार ७९२ चाचण्या प्रतिदिन अशी असून ६८ लाखांच्या पुण्यात २२ हजार चाचण्या प्रतिदिन इतकी आहे. या शहरांच्या तीन ते चारपट लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ ४० हजार प्रतिदिन चाचण्यांनी शहराचे नेमके चित्र लक्षात येणार नाही आणि त्यातून कोरोना स्थिती हाताळणे भविष्यकाळात पुन्हा कठीण होऊन बसेल. आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांच्या प्रमाणाचा विचार केला तर राज्यात जवळजवळ ४० टक्के चाचण्या या अँटीजेन पद्धतीने होत आहेत.

२६ एप्रिल रोजी नोंदलेल्या मुंबईतील २८ हजार चाचण्यांमधील ४० टक्के अँटीजेन चाचण्या गृहित धरल्या, तर केवळ १६ हजार ८०० आरटी-पीसीआर चाचण्या मुंबईत होत आहेत. इतक्या कमी संख्येत जर आरटीपीसीआर चाचण्या होत असतील, तर मुंबईचे नेमके चित्र डोळ्यापुढे येऊच शकणार नाही. मुंबईचा संसर्ग दर हा सातत्याने १४ ते १८ टक्के असताना आणि राज्याचा संसर्ग दर २५ ते २७ टक्क्यांच्या आसपास असताना एकूणच कमी चाचण्या आणि त्यातही कमी आरटीपीसीआर चाचण्या हे अजिबात परवडणारे नाही.

- Advertisement -

मुंबईच्या बाबतीत अतिशय सजगतेने काम करण्याची गरज आहे. कारण, मुंबईतून संक्रमित लोक हे गावी गेले आहेत. गेल्या लाटेत त्यांचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग जसे झाले होते, तसे आता होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढते आहे. मुंबईची मृत्यूसंख्या सुद्धा सातत्याने दडविण्याचे काम होते आहे. रिकन्सिलिएशनचे काम अजून पूर्णत्त्वास गेलेले नाही. त्यामुळे जुनी मृत्यूसंख्या नंतर टप्प्याटप्प्याने अधिक करून नेमके चित्र उभे राहणार नाही. मुंबईच्या घाटांवर रोज अंत्यसंस्कार होणारे मृतदेह आणि रोजची दिली जात असलेली मृत्यूसंख्या याचा कुठेही ताळमेळ नाही. हीच परिस्थिती राज्यांतील अन्य जिल्ह्यांत सुद्धा आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

ते पुढे म्हणतात, आपल्याला जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचे नाही. कोरोना कमी व्हावा, ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, संसर्ग दर १५ टक्क्यांच्या पुढे असताना कोरोना कमी होतोय, असे आभासी चित्र तयार करणे योग्य होणार नाही. कोरोना लाटेचे चक्र आपण राज्यात, देशात आणि जगात अनुभवले आहे. यादरम्यान आरोग्य सेवा आणि रूग्ण व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

- Advertisement -