घरमहाराष्ट्रराज्यात कडक निर्बंध लावले नसते, तर आज भयानक परिस्थिती असती!

राज्यात कडक निर्बंध लावले नसते, तर आज भयानक परिस्थिती असती!

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिले वास्तवाचे भान

राज्यात कडक निर्बंध लावले नसते तर आज भयानक परिस्थिती असती. 15 एप्रिलला महाराष्ट्रात निर्बंध लावण्याआधी विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पण, त्याची पर्वा न करता सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि आज बघत असाल तर आजूबाजूच्या राज्यात हाहा:कार उडाला असताना महाराष्ट्राची स्थिती त्या तुलनेत बरी म्हणावी अशी आहे. यामुळे यापुढेही नागरिकांनी स्वतःची आणि समाजाची काळजी घेऊन कडक निर्बंध पाळावेत, असे वास्तवाचे भान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले.

महाराष्ट्रातील जनतेला 1 मे दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांनी लोकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यात सध्या जे कडक निर्बंध लादले आहेत ते पुरेसे आहेत. यापेक्षा अधिक कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही असे मला वाटते.राज्यात 15 दिवस संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करा, असे मुंबई हायकोर्टाने गुरुवारी राज्य सरकारला सांगितले आहे. त्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली. हायकोर्टाने कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार करायला सांगितले आहे. त्यावर तुम्हाला आणखी कडक निर्बंध हवे आहेत का, अशी विचारणा मी जनतेला करत आहे. मला वाटते जनतेचे उत्तर नको असे असेल.

- Advertisement -

मलाही तसेच वाटत आहे. तुम्ही जो संयम आणि समजूतदारपणा दाखवत आहात ते पाहता यापेक्षा अधिक कडक निर्बंध लावण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, असा विश्वास मला वाटत आहे. त्यासाठी मला तुमचे सहकार्य हवे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. संपूर्ण देश आज कोरोनाच्या खदखदत्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. महाराष्ट्रात आपण कडक निर्बंध घातले नसते व संयम दाखवला नसता तर महाराष्ट्राची स्थितीसुद्धा आज भीषण झाली असती. सुदैवाने गेले काही दिवस आपल्या राज्यातील कोरोनाचे आकडे स्थिर झाले आहेत. ते आकडे कमी करण्यासाठी आणि कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला यापुढेही संयम दाखवायचा आहे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांचाही तपशील दिला.

आपण लॉकडाऊन केला आणि हात लॉक करून ठेवलेत असे झालेले नाही. आपण हातपाय हलवत आहोत. फिल्ड हॉस्पिटलची संख्या आपण वाढवली आहे. आता राज्यात साडेपाच हजार कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. ऑक्सिजन सुविधा, बेड्स याबाबत आपण सातत्याने काम करत आहोत. आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर आपला भर आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. आपण बेड, इतर गोष्टी वाढवू शकतो. पण डॉक्टर, नर्सेसचं काय? आता तर ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर लागतो आहे. राज्यात रोज 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होऊ शकतो; पण आज आपण 1700 मेट्रिक टन ऑक्सिजन रोज वापरतो आहोत. आपण बाहेरून ऑक्सिजन आणण्यासाठी आणि त्याच्या वाहतुकीसाठीही पैसे देत आहोत. ही फार विचित्र परिस्थिती आहे. आपण ही परिस्थिती समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहोत. पण रुग्णवाढ अधिक वाढली, तर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. सुदैवाने रुग्णसंख्या स्थिरावली आहे. ऑक्सिजन काठावर पुरवत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर नको
अचानक रेमडेसिवीरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सगळ्यांना रेमडेसिवीर पाहिजे. आपल्याला रोज सरासरी 50 हजार इंजेक्शनची गरज आहे. याचं वितरण केंद्राने स्वत:च्या हातात घेतलं आहे. सुरुवातीला आपल्याला 26 हजार 700च्या आसपास इंजेक्शन मिळतील अशी व्यवस्था केली. मी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य करून 43 हजार रेमडेसिवीरची सोय करण्यात आली. आज रोज 35 हजारच्या आसपास रोजचे रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत आहेत. पण एक गोष्ट आहे, की आपल्या टास्क फोर्सने आणि तज्ज्ञांनीही इशारा दिला आहे. रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर करू नका. गरजेपेक्षा जास्त दिलं तर औषधाचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

रोजी मंदावली तरी रोटी थांबणार नाही
जगभरात लाटांमागून लाटा येत आहेत. आपण किती प्रयत्न करतोय, त्यावर किती लाटा येणार आहेत ते अवलंबून असेल. राज्यात सध्या दुसरी लाट आली आहे. तज्ज्ञ सांगतायत की तिसरी लाट देखील येणार आहे. मग आत्तापासूनच आपण तिसर्‍या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. तिसरी लाट आली तरी त्याचे घातक परिणाम राज्यावर होऊ न देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कंबर कसून उतरले आहे. लाट आल्यानंतर कडक निर्बंध लावण्याची गरज लागलीच, तरी अर्थचक्र थांबता कामा नये. रोजी मंदावली असली तरी रोटी थांबणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -