Monday, June 7, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE कोरोनामुक्त गाव ही लोकचळवळ करावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सरपंचांशी संवाद  

कोरोनामुक्त गाव ही लोकचळवळ करावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सरपंचांशी संवाद  

तिसरी लाट थोपवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन चळवळीच्या स्वरूपात काम करावे आणि कोरोनाला गावातून हद्दपार करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Related Story

- Advertisement -

कोरोनाचे संकट आपल्याला लवकरात लवकर संपवायचे आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी आपापले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि गावामध्ये कोरोनामुक्तीची लोकचळवळ निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नाशिक, कोकण आणि पुणे विभागातील सरपंचांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोनामुक्त गावासाठी सरपंचांना प्रयत्न करण्यास सांगितले. सरपंचांनी गावांचे पालक म्हणून जबाबदारी घ्यावी. गावात सरकारच्या सूचनांप्रमाणे विविध उपाययोजना राबवून ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’चे ध्येय लवकर साध्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना अजून संपलेला नाही. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेतील चुकांची पुनरावृत्ती आता होता कामा नये. सतत लाॅकडाऊन आपल्याला चालणार नाही. यासाठी सर्व गावांनी आपले गाव, आपला तालुका, आपला जिल्हा आणि त्या माध्यमातून संपूर्ण राज्य कसे कोरोनामुक्त होईल याचा विचार करून पुढाकार घ्यावा. हे काम चळवळीच्या स्वरूपात करावे. जोपर्यंत कोरोना आहे, तोपर्यंत गावकरी सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळतील याची काळजी घ्यावी. गावात कोठेही सभा, समारंभ, लग्नसोहळे, मोर्चे, आंदोलने यासारखी गर्दी जमवणारे कार्यक्रम होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सरपंचांना केले.

- Advertisement -

गावात काम करणारे सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी हेच गावच्या व्यवस्थेच्या पाठकणा आहेत. या सर्वांनी कोरोनामुक्तीसाठी आतापर्यंत भरीव काम केले आहे. आता तिसरी लाट थोपवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन चळवळीच्या स्वरूपात काम करावे आणि कोरोनाला गावातून हद्दपार करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पहिली लाट ओसरल्यानंतर आपण थोडेसे गाफील राहिलो. त्यामुळे दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागाला मोठा फटका बसला. आता तिसरी लाट येणार नाही यासाठी सर्व पातळ्यांवर कार्यवाही करणे गरजेचे आहे. लसीकरणाचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण होईल यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. म्युकरमायकोसिसचे नवीन आव्हान आपल्यासमोर आले आहे. यालाही रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. ठरवले तर गाव कोरोनामुक्त होऊ शकते हे हिवरेबाजारने दाखवून दिले आहे. त्याच धर्तीवर सर्व सरपंचांनी पुढाकार घेऊन आपापले गाव कोरोनामुक्त करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी  केले.

१५ दिवसात गाव कोरोनामुक्त होऊ शकते

- Advertisement -

संकटाच्या काळात महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चळवळी झाल्या आहेत. आता कोरोना संकटकाळातही कोरोनामुक्तीसाठी चळवळीच्या स्वरूपात काम केले पाहिजे. आपण ठरवले तर पंधरा दिवसात संपूर्ण गाव कोरोनामुक्त होऊ शकते, असा विश्वास हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केला. यासाठी सरकारने दिलेल्या नियमानुसार सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. स्पर्धेचे किंवा बक्षिसाचे ध्येय न ठेवता गाव संपूर्ण कोरोनामुक्त करण्यासाठी या कामाला चळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -