घरमहाराष्ट्रना ऑक्सिजन, ना बेड, ना व्हेंटिलेटर, मृतांची संख्या वाढतेय, सरकारने आर्थिक मदत...

ना ऑक्सिजन, ना बेड, ना व्हेंटिलेटर, मृतांची संख्या वाढतेय, सरकारने आर्थिक मदत दिली पाहिजे का?

Subscribe

राज्यात कोराना संसर्गाचा दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून अनेक रुग्णांचा ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर अभावी मृत्यू होत आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येबरोबर सेवासुविधांचा अभाव जाणवत आहे. राज्यात अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन अभावी शेकडो कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर अनेक गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरवर अभावी प्राण गमावावे लागले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूणच परिस्थिती चिंताजनक बनत आहे. दरम्यान राज्य सरकारने कोरोनाबाधितांना योग्य आरोग्य सुविधा देणे अपेक्षित असतानाही सुविधां अभावी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे एखाद्या घरातील कमावता पुरुष अथवा कोणी कोरोनावरील उपचारादरम्यान सुविधां अभावी मृत झाला तर त्याला जबाबदार संबंधित यंत्रणा आहे. दरम्यान नालासोपारा, नाशिक, सांगली, पुणे, बीड, सातारा यांसारखा जिल्हांमध्ये अपुऱ्य़ा आरोग्य सुविधेमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा घटना घडल्या आहेत. या मृत रुग्णांचा नातेवाईकांनी संबंधीत रुग्णालयाला दोषी ठरवत कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान या अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा नातेवाईकांना आर्थिक मदत राज्य सरकारने दिली पाहिजे अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. शहर-जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये खाटा आहेत, परंतु ऑक्‍सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर नाहीत, हे वास्तव दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहे. त्यामुळे सुविधांअभावी मृत्यू होणाऱ्य़ा रुग्णांचा नातेवाईकांना आर्थिक मदत पुरवणे गरजेचे असल्याची मागणी केली जात आहे.

राज्यातील ऑक्सिजनची मागणी

महाराष्ट्रातील एकूण रुग्णांपैकी एक दशांश रुग्णांना ऑक्सिजन पुरावावा लागतो आहे, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवतात. पण ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा नाही. राज्यात दररोज सुमारे 1200 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनचं उत्पादन होत असलं, तरी तो सर्वच ऑक्सिजन कोव्हिड रुग्णांसाठी वापरावा लागतो आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होऊ लागली आहे- सध्या राज्यातील ऑक्सिजनची मागणी 1500 ते 1600 मेट्रिक टन इतकी आहे, आणि यात काही घट होण्याची चिन्हं नाहीत.

- Advertisement -

राज्यातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तुटवड्यावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांपुढे राज्यातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड्स, इंजेक्शन संदर्भातील भीषण वास्तव मांडले. महाराष्ट्रात सध्या ६० हजारांहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर असून ७६ हजार ३०० ऑक्सिजन बेड्स व २५ हजारपेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्राला दररोज १५५० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून ३०० ते ३५० मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राबाहेरून आणला जात आहे. राज्याला दूरच्या अंतरावरील इतर राज्यांतून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याऐवजी जवळपासच्या राज्यातून ऑक्सिजन पुरवठा झाला तर तो लवकर उपलब्ध होईल, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध असणे गरजेचे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. यावेळी १३ हजार जम्बो सिलेंडर व सुमारे ११०० व्हेंटिलेटर्स मागणीही त्यांनी केली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -