Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मोफत लसीकरणाच्या घोषणेवर काँग्रेस नाराज

मोफत लसीकरणाच्या घोषणेवर काँग्रेस नाराज

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीला फटकारले, श्रेयाची लढाई योग्य नाही

Related Story

- Advertisement -

राज्यातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना येत्या १ मेपासून मोफत लस देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेल्या घोषणेवर आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रेय घेण्यासाठी घोषणा करणे हे काँग्रेसला आवडलेले नाही. यात श्रेयाची जी लढाई सुरू आहे ती योग्य नाही, अशा शब्दात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसला फटकारले.

कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त लसीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी परदेशातून लस आयात करण्याची तयारी ठेवली आहे. अशातच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधित मोफत लस देण्याचा अधिकृत निर्णय राज्य सरकारने घेतलेला नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी मोफत लस देण्यात येईल, असे जाहीर केले. मलिक यांच्या पाठोपाठ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत सरकारने मोफत लसीकरणाचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. मात्र, त्यांनी लगेच ट्विट मागे घेतले.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर सोमवारी पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी आघाडीतील श्रेयाच्या चढाओढीबद्दल नाराजी व्यक्त केली. मोफत लस देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला पाहिजे.याबाबत चर्चा सुरू असून श्रेयासाठी घोषणा करणे योग्य नाही, असे थोरात म्हणाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्वांना मोफत लस देण्याची मागणी केली आहे. नागरिकांना मोफत लस मिळावी ही काँग्रेसची भूमिका असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आग्रह धरला आहे.

- Advertisement -