Corona Vaccination: ‘आज आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत’

Corona Vaccination Will Be Inaugurated By CM Uddhav Thackeray
Corona Vaccination: 'आज आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत'

मुंबईच्या बीकेसी लसीकरण केंद्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी लसीकरण मोहीमेचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. या शुभारंभ कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आज आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत. अनेकदा आपण काही शब्द वापरतो, त्या शब्दाचा अर्थ असतो किंवा नसतो. पण एक प्रथा म्हणून वापरत असतो. पण आज मी जो शब्द वापरला आहे, क्रांतिकारक पाऊल या शब्दाबद्दल कोणाचेही दुमत असण्याची अजिबात शक्यता नाही आहे. हेच ते ठिकाण आहे, जे एप्रिल, मे, जूनमध्ये तुडुंब भरून वाहत होते. पावसाळ्याने नाही तर कोरोना रुग्णांनी. अनेक कोरोना रुग्ण इथे आले. पण आपलं काय होणार याचा विचार न करता ज्यांनी ज्यांनी या रुग्णांची सेवा केली. त्यांनी त्या रुग्णांचे जीव वाचवले अशा कोविड योद्धांना माझा मानाचा मुजरा.’

पुढे काय म्हणाले मुख्यमंत्री?

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘अक्षरशः ते दिवस आठवल्यानंतर अंगावरती शहारे येतात. एकच चिंता होती, तणाव होतो. काही हाताशी नसताना पुढे कसं जायचं हा एक मोठा प्रश्न होता. पण या संकटाच्या काळात कोरोना योद्धे नसते तर कोविड सेंटर आज असं पाहायला मिळालं नसतं आणि हे असंच पाहायला मिळो, अशी माझी प्रार्थना आहे. सुरुवातीच्या काळात आपल्याला सगळ्या कल्पना आहे, मुंबई असो किंवा संपूर्ण जगात असो हॉस्पिटल पुरत नव्हती. मग तेव्हा युद्ध कालीन परिस्थितीत जसं एखादं काम केलं जातं, त्याप्रकारे हे कोविड सेंटर उभारण्यात आलं. अनेकांना असं वाटत होत, काय होणार, कसं होणार? पण आपण मुंबईत, राज्यात अनेक कोविड सेंटरची उभारणी केली.’

सर्वात उत्तम लस आपल्या तोंडावर असलेला मास्क

‘आज क्रांती करणारा दिवस उजाडलेला आहे. अनेक दिवस आपण ऐकत होतो, लस येणार येणार येणार. पण लस काही येत नव्हती. पण आज आपल्या हातात लस आली आहे आणि त्यांची सुरुवात आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे. अजूनही संकट टळलले नाही आहे. आता काय लस आली आहे, आता काहीही होऊ शकत. पण नाही लस देण्यास आता सुरुवात होत आहे. सर्वांना लस देईपर्यंत काही दिवस, काही महिने लागणार आहेत. या लसीचा प्रभाव किती आहे? हे येत्या दिवसांमध्ये कळेल. लस तर आलेली आहे, पण सर्वात उत्तम लस आपल्या तोंडावर असलेला मास्क आहे. त्यामुळे मास्क घालणं सोडायचं नाही. लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत या संकटाचा आपण सामना केलेला आहे, त्या तीन सुत्रांनी केलेला आहे. मास्क घाला, हात धुवा आणि अंतर ठेवा. या तीन सुत्रांचा आपल्याला विसर पडला तर पुन्हा हे संकट येऊ शकतं आणि असं संकट येऊ नये. आज लसीकरणाला सुरुवात झाली आहे, पण आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे. जोपर्यंत आपण कोरोनाचा शेवट करत नाही, तोपर्यंत आम्ही ज्याकाही सूचना वेळोवेळी देतो, त्याचे आपण काटेकोरपणे पालन करावे,’ अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.


हेही वाचा – प्राण गमावलेल्या कोरोना योद्धांबद्दल बोलताना मोदींचे डोळे पाणावले