Coronavirus: राज्याचा आकडा १२२ वर, मुंबईत एकाच दिवशी वाढले ९ करोना रुग्ण

एकाच दिवसात राज्यात १५ नव्या करोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.

corona patients

महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा आकडा आणखी वाढला असून ११६ वरुन ही संख्या १२२ वर पोहोचली आहे. एकाच दिवसात राज्यात १५ नव्या करोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यातील एकट्या मुंबईत ९ जणांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले. तर, मुंबईत बुधवारी सकाळी ४ जण कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यानंतर संध्याकाळी नव्याने ५ जण आणि ठाण्यातील आणखी एकाला करोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, राज्याची एकूण संख्या १२२ वर पोहोचली आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण ५२ करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी आढळलेल्या ५ जणांना संसर्गातून करोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर, ठाण्यात आढळलेल्या करोना रुग्णाचा यूएसए प्रवास इतिहास आहे.


हेही वाचा – CoronaVirus : करोनामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात वाढला दुरावा!

मुंबईत संसर्गातून ९ जणांना करोना

सांगलीतील इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आहे. तर, मुंबईत दिवसभरात करोनाचे नऊ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सकाळी नोंदवण्यात आलेल्या चार रुग्णांना प्रवास इतिहास अथवा संसर्गातून करोनाची लागण झाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. तसेच, संध्याकाळी मुंबईत नव्याने आढळलेल्या ५ रुग्णांनाही संसर्गातून करोना झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशातील पहिले दोन रुग्ण ‘करोना’मुक्त

देशातील पहिले ‘करोना’बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण गुढीपाडव्याला ‘करोना’मुक्त होऊन घरी परतले आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन सुरू असतानाही रुग्णांची संख्या मात्र अद्याप कमी झालेली नाही. राज्यात करोनाबाधितांची संख्या आता १२२ वर पोहचली आहे. हा वाढता आकडा लक्षात घेऊन यापुढे अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्यातील करोना बाधित रुग्णांची आकडेवारी 

मुंबई शहर आणि उपनगर – ५१
पिंपरी चिंचवड मनपा – १२
पुणे मनपा – १९
नवी मुंबई – ५
कल्याण – ५
नागपूर – ४

यवतमाळ – ४
सांगली – ९
अहमदनगर – ३
ठाणे – ३
सातारा – २
पनवेल- १
उल्हासनगर – १
औरंगाबाद – १
रत्नागिरी – १
वसई-विरार – १