घरताज्या घडामोडीपुण्यातले करोना रुग्ण ४० लोकांसोबत दुबईला गेले होते!

पुण्यातले करोना रुग्ण ४० लोकांसोबत दुबईला गेले होते!

Subscribe

पुण्यात आढळलेले करोना बाधित रुग्ण इतर ४० जणांच्या गटासोबत नुकतेच दुबईहून परतले असून ते राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परतले असल्याची माहिती पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी दिली आहे.

महाराष्ट्रात करोनाचा एकही पॉजिटिव्ह रुग्ण नसल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांकडून केला जात होता. मात्र, आता पुण्यात करोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. रविवारी पुण्यात हे दोन रुग्ण सापडले असून त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन परिस्थितीची माहिती दिली. या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, असं आवाहन विभागीय आयुक्तांकडून करण्यात आलं आहे. हे दोन्ही रुग्ण फेब्रुवारी महिन्यात दुबईला जाऊन आले होते, अशी देखील माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

४० जणांसोबत गेले होते दुबईला!

दरम्यान, पुण्यात सापडलेले २ करोना रुग्ण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ४० जणांच्या गटासोबत दुबईला गेले होते, अशी माहिती या रुग्णांच्या चौकशीतून समोर आली आहे. ‘हे रुग्ण १ मार्चला मुंबई विमानतळावर उतरले. त्यांच्यासोबत असलेले ४० जण राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले होते. या दोघांनी मुंबई विमानतळावरून कॅब केली आणि ते पुण्याला आले. तर इतर सर्वजण आपापल्या जिल्ह्याकडे रवाना झाले. या दोन्ही रुग्णांना तात्काळ नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याशिवाय, शहरातल्या इतर डॉक्टरांनी रुग्णाच्या परदेश दौऱ्याची माहिती घ्यावी. लक्षणं आढळली, तर ताबडतोब नायडू रुग्णालयात दाखल करण्यात यावं, असं देखील बजावण्यात आलं आहे’, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

- Advertisement -

त्या ४० जणांचं काय?

या दोन्ही रुग्णांसोबत इतर ४० जण देखील दुबईत गेले होते आणि त्यांच्यासोबतच ते परत आले आहेत. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे रुग्ण गेले असून त्यासंदर्भात त्या त्या जिल्हा प्रशासनाला कळवल्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितलं. हे रुग्ण कुठे कुठे गेले होते त्यासदर्भातली माहिती घेण्यासाठी डॉक्टरांचं एक वेगळं पथक स्थापन करण्यात आलं आहे.


वाचा सविस्तर – CoronaVirus Update: महाराष्ट्रातही आढळले २ करोना बाधित रुग्ण!

गरज असेल, तरच प्रवास करा

‘गर्दीची ठिकाणं टाळा. आवश्यकता असेल, तरच प्रवास करा. आम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नाही. त्यामुळेच आम्ही ही सर्व काळजी घेत आहोत’, असं देखील आयुक्त यावेळी म्हणाले. ‘पुण्यातल्या डॉक्टरांना आम्ही विनंती केली आहे की पुण्यातल्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांनी जर कुठे बाहेर प्रवास केला असेल, तर त्याची तपासणी करा. सर्दी, खोकला, साधा ताप अशी काही लक्षणं आढळल्यास त्यांची तपासणी करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. एकूण २७० बेड आम्ही रुग्णांच्या उपचारांसाठी तयार ठेवले आहेत’, अशीही माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -