Cororna Virus: राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी लागू, अनिल परब यांची विधानसभेत माहिती

Corona Virus state government impose strict restrictions 9 to 6 am night curfew in maharashtra
Cororna Virus: राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी लागू, अनिल परबांची विधानसभेत माहिती

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण आणि ओमिक्रॉनबाधितांच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची माहिती दिली आहे. तसेच यावेळेत ५ पेक्षा जास्त लोक एकत्रित जमल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. नाताळ आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याचा अंदाज वर्तवला होता. गर्दी होण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहेत.

मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती  यांनी संपूर्ण राज्यात सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंदी असणार आहे. लग्न समारंभात एकाच वेळी उपस्थितांची संख्या १०० वर नसेल तर खुल्या जागेवर २५० पेक्षा अधिक नसेल. या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के कमी असेल तशी संख्या असेल. उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांमध्ये बंदिस्त जागेवर आसन क्षमता असेल तिथे ५० टक्के आसन क्षमतेपेक्षा अधिक लोकं नसतील तसेच ज्या जागी आसन क्षमता  निश्चित नसेल तिथे २५ टक्के उपस्थिती असतील असे मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

नियमावली जाहीर 

संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.

लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी  क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.


हेही वाचा :  एसटीचं विलिनीकरण शक्य नाही, कर्मचाऱ्यांनी ते डोक्यातून काढावं – अजित पवार