घरताज्या घडामोडीकरोनाचा 'तो' चालक मुंबईचा नाही

करोनाचा ‘तो’ चालक मुंबईचा नाही

Subscribe

सध्या करोना व्हायरसची दहशत पसरत आहे. पुण्यात पाच करोना रुग्ण आढळले आहेत. या करोना रुग्णामधील तो चालक पुण्यातील असल्याचं पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्यापाठोपाठ करोनाचा संसर्ग मुंबईत पसरतो की काय याची भीती असताना सध्या मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये सहा संशयितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुंबईतही करोना पसरु शकतो अशी दाट शक्यता आहे. कारण, दुबईहून आलेल्या ४० जणांपैकी चार जणांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान, ४० जणांपैकी सात प्रवासी हे एकट्या पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील आहेत आणि उर्वरीत हे वेगवेगळ्या जिल्ह्यातून दुबईला गेले होते. आतापर्यंत पुण्यात पाच करोना रुग्ण आढळले आहेत. ज्यात दुबईहून परत आलेल्या एका जोडप्याचा, त्यांच्या मुलीचा समावेश आहे. सोबतच हे जोडपं ज्या कॅबने मुंबईहून पुण्याला गेले त्या कॅबचालकाला आणि त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका प्रवाशाला करोना झाल्याचं समोर आलं आहे.

दुसरा प्रवासी यवतमाळचा 

यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्या दाम्पत्याला घेऊन गेलेला चालक पुण्याचा असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्याच्याकडे ओला गाडी नव्हती तर खासगी गाडीचा तो चालक होता. हे दाम्पत्य एका खासगी ट्रॅव्हल कंपनीसोबत दुबईला फिरायला गेले होते. त्याचे कॉल रेकॉड्स चेक केले जात आहेत. तो अजून कुठे कुठे गेला आहे याचीही तपासणी केली जात आहे. अद्यापपर्यंत मुंबईत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्याच्यासोबत जो दुसरा प्रवासी होता तो यवतमाळ येथील आहे.

- Advertisement -

राज्यात बाधित भागातून एकूण ५९१ प्रवासी आले

आतापर्यंत पुण्यात एकूण १२ संशयितांवर उपचार सुरू असून मुंबईत सहा जणांवर उपचार सुरू आहेत. १० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार, सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या तीन विमानतळांवर करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या शिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इरण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या करोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरू असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ५९१ प्रवासी आले आहेत.

राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध

१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर सहा जण मुंबईत दाखल आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध आहेत.

- Advertisement -

५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीक्रण कक्षात भरती करण्यात येत आहे. तर १२ मोठया प्रमाणावर करोना बाधित असणाऱ्या देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर, अमरावती, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यातूनही बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

आतापर्यंत मुंबईत सहा जणांवर उपचार सुरू आहेत. हे सर्व संशयित प्रवासी आहेत. मुंबईत एकही आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. जो ड्रायव्हर त्या जोडप्याला घेऊन गेला तो ही पुण्याचा आहे. त्यामुळे, मुंबईत एकही रुग्ण पॉझिटिव्ह आलेला नाही. जे रुग्ण दाखल आहेत त्यांच्यावर कस्तुरबा हॉस्पिटसलमध्ये उपचार सुरू असून हे सर्व संशयित आहेतडॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी


हेही वाचा – मोबाइलवरील करोनाच्या कॉलरट्यूनमुळे ग्राहक वैतागले; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -