कस्तुरबामधून करोनाचा १०० वा रुग्ण घरी

बरे झालेल्या रुग्णांमध्ये २४ ज्येष्ठ नागरिक

मुंबईत करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून कस्तुरबा रुग्णालय चर्चेत आले आहे. या रुग्णालयात अनेक करोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हे सत्य असले तरीही अनेक रुग्ण या रुग्णालयातून बरे होऊन घरीही गेले आहेत. मंगळवारी कस्तुरबा रुग्णालयातून शंभरावा रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. विशेष म्हणजे घरी पाठवण्यात आलेल्या १०० रुग्णांमध्ये २४ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाने ‘करोना कोविड १९’ या आजाराविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मंगळवार याच रुग्णालयातून ‘कोरोना कोविड १९’ ने बाधित शंभरावा रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. घरी परतण्यापूर्वी निरोप घेताना या रुग्णाने कस्तुरबा रुग्णालयातील अत्यंत सेवाभावाने काम करीत असलेले डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह सर्वच कर्मचार्‍यांचे व्यक्तिशः आभार मानले आहेत. साधारणपणे मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात संपूर्ण मुंबईत ‘करोना कोविड १९’चा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आजपर्यंत कस्तुरबा रुग्णालय हे ‘करोना कोविड १९’ने बाधित रुग्णांना अव्याहतपणे सेवा देण्यात अग्रेसर आहे.

या रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, कामगार, कर्मचारी अक्षरशः दिवस-रात्र एक करून रुग्णांवर औषधोपचार करीत आहेत. कस्तुरबा रुग्णालयातून आजवर १०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये ६० पुरुषांचा आणि ४० महिलांचा समावेश आहे. तसेच यामध्ये ६० वर्षांवरील वय असणार्‍या २४ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तर १० वर्षांखालील ७ बालकांचाही बरे होऊन घरी परतलेल्यांमध्ये समावेश असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.