Coronavirus Impact: सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलच्या वेतनाबाबत महत्त्वाची बातमी

Chief minister Uddhav Thackeray | Cabinet Decision
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुली जमेवर प्रतिकूल परिणाम झाला असला तरी, सरकारी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. महसुली उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता खर्चात काटकसर करण्याच्या उद्देशाने सर्व सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन मार्चपासून दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने मार्चच्या वेतनाचा पहिला टप्पा अदा करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात मार्चच्या उर्वरित वेतनाचा दुसरा टप्पा आणि एप्रिलचा पहिला टप्पा प्रदान करण्याचे विचाराधीन होते. तथापि प्रत्येक महिन्यात पंधरा-पंधरा दिवसाची दोन देयके तयार करावी लागल्याने देयके तयार करणारी आस्थापना व कोषागारांचा कामावरचा ताण वाढला असता. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालये सध्या 10 टक्के एवढ्या कर्मचारी क्षमतेवर सुरू आहेत. काही विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक महिन्यात दोन देयके तयार करण्यामुळे वेतन प्रदान करण्यास आणखी विलंब झाला असता त्यामुळे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्चचे उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील वेतन शक्यतो गणेशोत्सवाच्या वेळी प्रदान करणे प्रस्तावित असून याबाबत स्वतंत्ररीत्या आदेश निर्गमित करण्यात येतील, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.