घरCORONA UPDATECorona Live Update: पुण्यात २४ तासांत १,२५१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

Corona Live Update: पुण्यात २४ तासांत १,२५१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

Subscribe

पुण्यात २४ तासांत १ हजार २५१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचा नोंद झाली असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २३ हजार ६८०वर पोहोचला आहे, अशी माहिती पुण्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

- Advertisement -

मुंबईत आज १ हजार ५११ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ७५ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा ७८ हजार ७०८वर पोहोचला असून मृतांचा आकडा ४ हजार ६२९ झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे. सविस्तर वाचा 


आज गोव्यात ७२ नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे गोव्यात एकूण कोरोनोबाधितांचा आकडा १ हजार ३८७वर पोहोचला असून सध्या ७१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ६७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत गोव्यात ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

कल्याण-डोबिंवलीत आतापर्यंत १२३ जणांचा मृत्यू 

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बुधवारी कोरोना बाधित ३५० रुग्ण आढळून आले. तर २४ तासात ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित आकडा ६ हजार ९२५वर पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनाने १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. २ हजार ८८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ३ हजार ९१७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहे.
कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने २ जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. सदर लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता फेरीवाले, फळ विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि एकही फेरीवाला विक्रेता रस्त्यावर बसून वा फिरुन व्यवसाय करणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात तेथील नागरिकांसाठी लॉकडाऊन संदर्भात लाऊडस्पिकरद्वारे उद्घोषणा ठराविक अंतराने दिवसभर सुरू ठेवावी तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या, मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाही करावी असेही निर्देश पालिका आयुक्त यांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरीकांवर तसेच अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्या वाहनांची खात्री करुन त्यांच्यावर कारवाई करावी असे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

कोरोना संकटात आरोग्य सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे रुग्णांनी टाळ्या वाजवत केले स्वागत 

एक जुलै ‘डॉक्टर डे’ सध्या सुरू असलेल्या कोरोना या जागतिक महामारीच्या कार्यकाळात असंख्य खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आपली दवाखाने, रुग्णालय हे कोरोना संसर्गाच्या भीतीने इतर रुग्णांवर उपचार करण्याचे टाळून आपले दवाखाने बंद करून बसले आहेत. अशा परिस्थितीत भिवंडी शहरातील पद्मा नगर येथील डॉक्टर श्रीपाल जैन या युवा डॉक्टर यांनी मागील तीन महिन्यांपासून आपला दवाखाना एक ही दिवस बंद न ठेवतात बारा तासांहून अधिक काळ रुग्णांवर उपचार सुरू ठेवले आहेत.
यादरम्यान कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर सुद्धा डॉक्टर श्रीपाल जैन यांनी उपचार केले असून एवढेच नाही तर येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला कोरोनास घाबरून न जाता काही नियम व आरोग्य सूचनांचे पालन केल्यास त्यावर मात करता येऊ शकते अशी जनजागृती सुद्धा रुग्णांची केले आहे. एक जुलै ‘डॉक्टर डे’च्या दिवशी डॉक्टर श्रीपाल जैन यांच्या दवाखान्यात उपचाराकरिता आलेल्या रुग्णांनी डॉक्टर व त्यांचे सहकारी करीत असलेल्या आरोग्य सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत डॉक्टरांचे टाळ्या वाजून अभिनंदन केला आहे. रुग्णांकडून झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागताने खुद्द डॉक्टर श्रीपाल जैन सुद्धा भारावून गेले होते.

राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५३७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १२९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ८० हजार २९८वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ८ हजार ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


वसई विरारमध्ये १७५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा ४ हजार ३१२वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत वसई-विरारमध्ये २ हजार ७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


आधारवाडी मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना कारागृहातून बाहेर काढून तात्पुरत्या स्वरुपात कल्याणमधील डॉनबॉस्को हायस्कूलमध्ये जेल क्वारांटाईन केले असता पोलीस बंदोबस्त तैनात असलेल्या या कैद्यांनी काल पलायन केल्याची घटना घडल्याने येथे खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये आधारवाडी कारागृहाचे पोलीस शिपाई अशोक पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. गेल्या पंधरा दिवसात कैदी पळल्याची ही दुसरी घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पंधरा दिवसापूर्वी आपल्या पत्नीच्या हत्येत आरोपी असणाऱ्याला टाटा आमंत्रा येथे कोरोनाबाबत उपचारार्थ दाखल केले होते. मात्र गर्दीचा फायदा घेत या कैद्याने तेथून पलायन केले होते.

कोरोनासंसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर कल्याण जिल्हा कारागृह येथील कैद्यांना आजाराचा संसर्ग होऊ नये याकरिता उमेश रमेश जाधव आणि गणेश उर्फ गणपती निवृत्ती दराडे यांना डॉन बॉस्को हायस्कूल येथे जेल क्वारांटाईन केले होते. काल सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान हे दोघेही कैदी हॉलच्या पाठीमागील प्लायवूड तोडून पोलिसांची नजर चुकवून पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेले आहेत. यासंदर्भात खडकपाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे हे या पलायन केलेल्या कैद्यांचा शोध घेत आहेत.

सोशल डिस्टन्सिंगचा उडला फज्जा; केडीएमसीचा नियोजनशून्य कारभार

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वॉर्ड बॉयच्या ८० जागांसाठी बुधवारी हजारो तरुणांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा चांगलाच फज्जा उडाला होता. या घटनेतून केडीएमसीच्या नियोजनशून्य कारभाराचे पुन्हा एकदा दर्शन कल्याणकरांना झाले.
कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या तसेच मनपा कोविड रुग्णालयासाठी वॉर्ड बॉयच्या भरतीसाठी बुधवारी थेट मुलाखत घेत भरती प्रक्रिया आयोजित केली होती. वॉर्ड बॉयच्या ८० जागांसाठी सकाळपासूनच इच्छुक उमेदवार, पालकांनी मुख्यालय परिसरात गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले होते. कोणतेही नियोजन नसल्याने ही भयानक गर्दी पालिका मुख्यालयातच झाली होती. या ८० जागांसाठी हजारो तरुण मुलाखत देण्यासाठी आले होते. अखेर या सर्वांना पालिका मुख्यालया शेजारीच असलेल्या सुभाष मैदानात रांगेत उभे करण्यात आले. मात्र या रांगेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासण्यात आला. एकामागोमाग दाटीवाटीने हे तरुण गर्दी करून उभे होते.
पालिका प्रशासनाकडून लॉकडाऊन काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या साथ रोग नियंत्रण कायद्यान्वये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र याठिकाणी खुद्द पालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी एवढी गर्दी जमली आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने आता कोणावर कारवाई होणार असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.

राज्यात मागील २४ तासांत ७७ नव्या कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली असून एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १ हजार १५ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ६० पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. सविस्तर वाचा 


नाशिक शहर पोलीस दलात करोनाचा पहिला बळी

नाशिक जिल्ह्यात करोनाने धुमाकूळ घातला असून नाशिक ग्रामीण पोलीस दलापाठोपाठ नाशिक शहर पोलीस दलात करोनाने शिरकाव केला आहे. शहर पोलीस दलातील एका करोनाबाधित पोलीस कर्मचार्‍याचा करोनामुळे झाला असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शहर पोलीस दलातील पहिला करोना बळी आहे. दरम्यान, शहर पोलीस दलात ८ कर्मचारी करोनाबाधित आहेत. त्यापैकी ५ करोनामुक्त झाले आहेत. अद्याप दोघांवर उपचार सुरू आहेत. (सविस्तर वाचा)


कोरोनाच्या वाढत्या प्रभावात आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. गोव्यात बुधवारी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मडगावच्या कोविड रुग्णालयात उपचार घेताना मरण आलेल्या रुग्णांची संख्या एकूण चार झाली आहे. मृत्यू झालेली व्यक्ती ही ६४ वर्षीय ताळगाव येथे राहणारी होती.


कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक भान जपत यंदा आरोग्यउत्सव साजरा करण्याचं मंडळानं ठरवलं आहे.


भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांची एकूण संख्या सहा लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. देशात कोरोना व्हायरसमुळे आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनामुळे ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ५ लाख ८५ हजार ४९३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १७ हजार ४०० लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ३ लाख ४७ हजार ९७९ लोकं बरे झाले आहेत. दरम्यान गेल्या २४ तासांत १८ हजार ६५३ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद कऱण्यात आली आहेत तर ५०७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


कोरोना संसर्गाच्या काळात डॉक्टर रुग्णांची अहोरात्र सेवा करण्यात गुंतले असताना कोरोनाशी लढताना तब्बल १८ डॉक्टर शहीद झाले आहे. इतकेच नव्हेतर १२०० पेक्षा जास्त डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. आज १ जुलै रोजी ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जात असताना डॉक्टरांकडून होत असलेल्या कोरोनारुग्ण सेवेबद्दल समाजात आदराची भावना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -